नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर २४ परगणा येथील दत्तपुकुर भागात हा स्फोट झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत ३ जणांचा जागीच मृत्यू झाला असून या स्फोटात अनेकांच्या घरांचेही नुकसान झाले आहे. दरम्यान स्थानिक रहिवाशांचा दावा आहे की, या घटनेत किमान ६ ते ७ लोक ठार झाले आहेत.
एका वृत्तसंस्थेने याविषयी माहिती दिली आहे. दत्तपुकुरमधील बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. जखमींना उपचारासाठी बारासात रुग्णालयात नेण्यात येत आहे अशी माहिती दत्तपुकुर पोलीस सूत्रांनी दिली आहे.
#WATCH | West Bengal: Several people feared dead in an explosion at the Illegal crackers factory in Duttapukur. A rescue operation is underway. The injured are being taken to Barasat Hospital for treatment: Duttapukur Police sources pic.twitter.com/YzKW7cU8gM
— ANI (@ANI) August 27, 2023
यापूर्वी मे महिन्याच्या सुरुवातीला पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील एगरा येथे बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला होता. या घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. एगरा हा भाग ओडिशाच्या सीमेजवळ आहे. याप्रकरणी आरोपींनाही अटक करण्यात आली होती.
या घटनेतील मुख्य आरोपीचा नंतर ओडिशातील कटक रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, हा आरोपी स्फोटाच्या वेळी उपस्थित होता आणि ८० टक्के भाजला होता. त्याला अटक करण्यासाठी कटकला पोहोचलेल्या पोलिसांना त्याचा मृत्यू झाल्याचे हॉस्पिटलमध्ये समजले.