मुंबई : राज्यात काल तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. एकीकडे मनसेने शिवाजी पार्कमध्ये राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी केली तर दुसरीकडे मुख्यमंत्रीही विमानतळाबाहेर असणाऱ्या महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी पोहोचले होते. दरम्यान तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. याच मुद्द्यावरून मनसेचे अमेय खोपकर यांनी संताप व्यक्त केला.
राज्यात तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यावरुन मनसे नेत अमेय खोपकर आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात एका वृत्तवाहिनीच्या चर्चेदरम्यान शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, त्यांच्यातील हा वाद ट्विटरवरतीदेखील सुरु असल्याचे पहायला मिळत आहे.
तिथीनुसार शिवजयंती साजरी करायला जो आडकाठी आणतो, जो या मुद्द्याचंही किळसवाणं राजकारण करतो अशा राष्ट्रवादीच्या फालतू आमदाराला भर चौकात फटके मारायला पाहिजेत.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) March 22, 2022
“तिथीनुसार शिवजयंती साजरी करायला जो आडकाठी आणतो, जो या मुद्द्याचंही किळसवाणं राजकारण करतो अशा राष्ट्रवादीच्या फालतू आमदाराला भर चौकात फटके मारायला पाहिजेत,” असं म्हणत मनसे नेते अमेय खोपकर यांनी ट्वीट करत अप्रत्यक्षपणे अमोल मिटकरी यांच्यावर निशाणा साधला.
माझ्या सवे लढाया वाघास बोलवा रे l
कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही ll— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 22, 2022
दरम्यान त्यांच्या या ट्विटवर अमोल मिटकरी यांनीदेखील अप्रत्यक्ष उत्तर दिलं असून “माझ्या सवे लढाया वाघास बोलवा रे l कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही,” असे म्हटले आहे.
वृत्तवाहिनीच्या चर्चेदरम्यान अमोल मिटकरी यांनी शिवजयंती ही १९ फेब्रुवारीलाच साजरी झाली पाहिजे अशी भूमिका मांडली होती. यामध्ये व्होट बँकचे राजकारण दिसत आहे, असेही ते म्हणाले होते. यावर अमेय खोपकरांनी “आपण दरवर्षी दिवाळी, गणपती आणि हिंदू धर्माचे सण साजरे करतो ते तारखेनुसार साजरे करत नाही. महाराष्ट्रातील नव्हे, देशातील नव्हे जगातील सर्व लोकांसाठी छत्रपती शिवाजी महारांची जयंती हा एक सण आहे,” असे म्हटले होते.