मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या वक्तव्यावरुन शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. पुणे, नाशिक, महाड आणि औरंगाबादमध्ये शिवसेनेकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान नाशिकमध्ये भाजपाच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अपशब्द वापरल्याने शिवसैनिकांचा संताप अनावर झाला आहे. नाशिकमध्ये शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यालयाच फोडले आहे. भाजपच्या कार्यालयावर दगडफेक करत शिवसैनिकांनी हे कार्यालय फोडले आहे.
मुंबईत शिवसेना आक्रमक; नारायण राणेंविरोधात ‘कोंबडी चोर’ उल्लेख करत बॅनरबाजी
जुन्या नाशिकमध्ये भाजपचे वसंत स्मृती हे अलिशान कार्यालय आहे. शिवसैनिक गाडीत बसून आले आणि त्यांनी भाजपच्या कार्यालयावर प्रचंड दगडफेक केली. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला कोरोनाच्या काळात सावरले. त्यांनी महाराष्ट्र वाचवला. ते आमचे कुटुंब प्रमुख आहे. उद्धव ठाकरेंवर टीका केली तर त्याचे जशास तसे उत्तर दिलं जाईल. ही तर सुरुवात आहे, असा इशारा संतप्त शिवसैनिकांनी राणे यांना दिला.
नाशिकमध्ये भाजपच्या कार्यालयाची शिवसैनिकांनी तोडफोड केलेली असतानाच सांगलीतही शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले . शिवसैनिकांनी राणेंच्या पोस्टरला काळे फासून आपला निषेध नोंदवला. यावेळी शिवसैनिकांनी राणेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.