अकोले, (प्रतिनिधी) – मुथाळणेच्या पागिरवाडीतील घराला लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या कुटुंबाला माजी आ.वैभवराव पिचड यांनी भेटवस्तूची मदत करून दिलासा दिला आहे. अकोले तालुक्यातील मुथाळणे (पागिरवाडी) येथे पोपट बंडू हळकुंडे यांच्या घरात सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागून त्या आगीत या परिवाराचे अंगावरील कपडे सोडता सर्व काही जळून खाक झाल्याची घटना घडली होती.
या घटनेची माहिती माजी आमदार वैभवराव पिचड यांना समजताच त्यांनी घटनास्थळी भेट देत आवश्यक ती मदत करू, असे सांगत त्या परिवारास धीर दिला.अकोले येथील भाजप कार्यालयात वैभवराव पिचड मित्रमंडळाच्या वतीने त्या परिवारास संसारोपयोगी वस्तू, किचनमध्ये स्वयंपाकाला लागणारे सर्व साहित्य, महिनाभर पुरेल इतका किराणा माल, भाजीपाला व घरासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.
अकोले तालुक्यातील सामाजिक संस्थांनी, दानशूर व्यक्तींनी या परिवारास शक्य होईल ती मदत करावी, असे आवाहन माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केले. यावेळी भाजपचे जेष्ठ नेते गिरजाजी जाधव,अमृतसागर दूध संघांचे व्हाईस चेअरमन रावसाहेव वाकचौरे,
भाजपा तालुकाध्यक्ष यशवंतराव आभाळे, राजाभाऊ कानकाटे, भाजप ओबीसीचे तालुकध्यक्ष गोकुळ कानकाटे, चक्रधर सदगीर, तालुका सरचिटणीस सचिन जोशी,उपाध्यक्ष माधव भोर,साहेबराव दातखिळे, सचिन उगले, अशोक आवारी आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.