मुंबई – पोलिस अधिकारी सचिन वाझे प्रकरणावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकार बॅकफूटला गेल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांच्याकडील गृहखातं जाणार किंवा मुंबई पोलीस आयुक्तांची बदली होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र अनिल देशमुख सेफ राहिले आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली झाली. बदलीमुळं नाराज झालेल्या परमबीर सिंग यांनी खळबळजनक आरोप केले आहे. या सर्व मुद्यावरून पुन्हा एकदा विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली असून, सोशलवर मविआ सरकारवर भाजप नेत्याकडून टीका केली जात आहे.
तर दुसरीकडे सोशल मीडियावर विविध मिम्स व्हायरल होत आहेत. जळगावात एकनाथ खडसे यांच्यावरील एक मिम्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. काही महिन्यांपूर्वी नाथाभाऊ भाजपमध्ये मिळणाऱ्या वागणुकीला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. मात्र त्यांच्या मागे आता ईडीची चौकशी लागली आहे.
त्याला खडसे यांनी आक्रमकतेने उत्तर दिले होते. ‘माझ्या मागे ईडी लावली आहे. त्यामुळे आता मला सीडी लावावीच लागेल. सीडी लावण्याचे काम आता बाकी आहे,’ असा इशारा एकनाथ खडसे यांनी भाजपला दिला होता. मात्र त्यांच्या या विधानावरून सध्या सोशलवर मिम्स व्हायरल होते आहे. तुमच्या कडची सीडी आमचा बाजार उठल्यावर लावणार का ? असा प्रश्न सोशलवर चर्चेत असून ठाकरे सरकारला ट्रोल केले जात आहे. सोशल मीडियावर शरद पवार आणि एकनाथ खडसे यांच्यातील संभाषणाचा फोटो पोस्ट केला जात आहे. सोबतच विनोदी मजकूर लिहिलेले मिम्स तयार केले जात आहे. यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर हसू उमटत आहे.
तत्पूर्वी,उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटक आढळल्यापासून राज्याचं राजकारण तापलं आहे. त्यातच वाझे यांच्या चौकशीमुळे सरकार अडचणीत आलं असताना परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडली आहे.