शेतीपंपाचा विद्युत पुरवठा सुरळीत करा, अन्यथा…; रासपचा इशारा

महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्याचा दिला इशारा

बारामती (प्रतिनिधी) – तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती पंपाचा विद्युत पुरवठा खंडित केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. विद्युत पुरवठा सुरळीत केला नाही तर महाराष्ट्र बंद उग्र स्वरुपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी रासपचे जिल्हाध्यक्ष संदीप चोपडे व तालुकाध्यक्ष अमोल सातकर यांनी दिला आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने उपकार्यकारी अभियंता महावितरण कंपनी बारामती ग्रामीण यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. महावितरणच्या वतीने शेती पंपाचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. याबाबत पाठीमागच्या आठवड्यामध्ये रासपच्या वतीने उपकार्यकारी अभियंता यांना विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी निवेदन दिले होते. मात्र याबाबत कोणतीही दखल घेतली नाही. उलट विद्युत पुरवठा खंडित करण्याचे काम सुरूच ठेवले. त्यामुळे रासपच्या वतीने आज ठिय्या आंदोलन करण्यात आले. 

पाण्यावाचून शेतातील खाता तोंडाला आलेली पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. पूर्णसारख्या महामारीमुळे शेतकरी उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यात विद्युत पुरवठा खंडित केल्याने शेतीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांची ससेहोलपट सुरू आहे. महावितरणने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये. लवकरात लवकर विद्युत पुरवठा सुरळीत करावा. अन्यथा राष्ट्रीय समाज पक्ष संपुर्ण महाराष्ट्र उग्र स्वरूपाचे आंदोलन करेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

उपकार्यकारी अभियंता यांनी आंदोलनास भेट देऊन मागण्या सरकार दरबारी पोहचवू, असे आश्वासन  दिले. यावेळी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष संदिप चोपडे, तालुका अध्यक्ष अॅड.अमोल सातकर, जिल्हा प्रभारी किरण गोफणे, सतीश शिंगाडे, किसण हंडाळ, लखण कोळेकर, शैलेश थोरात, विठ्ठल देवकाते, महादेव कोकरे, काकासाहेब बुरूंगले, चंद्रकांत वाघमोडे, तानाजी मारकड, कमलेश हिरवे, किशोर सातकर, निखील दांगडे, तुषार गुलदगड, अण्णा पांढरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

बारामती तालुक्यात विशेषतः जिरायती पट्ट्यातील शेतकऱ्यांचे पाण्याविना मोठ्या प्रमाणात हाल सुरू आहेत. त्यातच महावितरण कंपनीने राज्य सरकारच्या आदेशानुसार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. शेती पंपासाठी लागणारी वीज कनेक्शन बंद केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीस आला आहे. शेतातील पिकांना पाणी मिळत नसल्याने पिके जळून चालली आहेत. सरकारच्या जुलमी कारभारामुळे शेतकरी संतप्त आहे. विद्युत पुरवठा सुरळीत झाला नाहीत तर हातातोंडाशी आलेली पिके जळून जाणार आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटाच्या खाईत लोटला जाईल. याबाबत गांभीर्यपूर्वक विचार करून विद्युत पुरवठा सुरळीत करणे गरजेचे आहे.

– अमोल सातकर, बारामती तालुकाअध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.