नागपूर – करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने नागपूर शहरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. शहरात १५ ते २१ मार्चपर्यंत लॉकडाऊन लागू केले आहे.
लॉकडाऊनदरम्यान पोलिसांना कडक संचारबंदी ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्याचबरोबर या काळात खासगी कार्यालये बंद राहणार असून शासकीय कार्यालयात २५ टक्के उपस्थितीला परवानगी असेल. खासगी आणि शासकीय आर्थिक विषयक, लेखा व मार्च एंडिंग संबंधित कार्यालये पूर्ण क्षमनेते सुरु राहतील. वैद्यकीय, पॅरामेडिकल आणि अत्यावश्यक सेवा सुरु राहतील.
तसेच, मद्यविक्रीची दुकाने लॉकडाऊनमध्ये बंद राहणार असली तरीही त्याची ऑनलाइन विक्री सुरु राहणार आहे. याशिवाय खाद्यपदार्थांची घरपोच सेवा सुरु राहील. यावेळी ओळखपत्र बाळगणे आवश्यक असेल, असेही नितीन राऊत यांनी सांगितले.
लॉकडाऊनच्या काळात लसीकरण सुरु ठेवले जाणार असून १३१ केंद्रावर अधिकाधिक लसीकरण करण्याची योजना आहे. यावेळी नितीन राऊत यांनी लोकप्रतिनिधी तसेच स्वयंसेवी संस्थांना लसीकरणासाठी लोकांच्या प्रवासाची सोय करण्याचे आवाहन केले.
अत्यावश्यक सर्व सेवा लॉकडाऊनच्या काळात सुरु राहणार आहेत. भाजीपाला, फळे, मांस, मासे, अंडी विकत घेण्यासाठी ही दुकाने सुरु राहतील. डोळ्यांचे दवाखानेही सुरु असतील, असे नितीन राऊत यांनी स्पष्ट केले.
घरी विलगीकरणात असणाऱ्या रुग्णांनी पूर्णवेळ घरातच असावे. यासाठी प्रशासनामार्फत अचानक भेट दिली जाईल. यावेळी कोणी दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा नितीन राऊत यांनी दिला आहे.