पुणे – “पहिल्या टप्प्यात डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस अशा व्यक्तींना करोना लस दिली जाणार आहे. आम्हाला परवानगी मिळेल, त्या दिवशी घेऊ. अजून आम्ही डॉक्टर, नर्स, पोलीस यामध्ये मोडत नाही. ज्यावेळी आदेश येतील, की यांनीही लस घेतली पाहिजे, आम्ही लगेच लस घेऊन तुम्हाला सांगू की, मी आज लस घेतली,’ अशी टिप्पणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
करोना लसीकरणाला अल्प प्रतिसाद मिळत आहे. लसीबाबत काही अडचणी येत आहेत. एका सेंटरवर शंभर जणांना लस दिली जाते. ग्रामीण भागात शंभरपैकी 61 जणांनी लस घेतली. शहरी भागात सुरुवातीला पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. दुसऱ्या दिवशी मात्र तो कमी झाला. पिंपरी-चिंचवडमध्ये तर 27 टक्केच लसीकरण झाले, असे पवार म्हणाले.
याविषयी पवार म्हणाले, कमी लसीकरणाबाबत अधिकाऱ्यांना विचारले तेव्हा काही कारणे समोर आली. संबंधित व्यक्ती आली आणि केंद्रावर आल्यावर म्हणाली की मला लस नाही घ्यायची. काही जणांना रात्री उशिरा कळवल्याने सकाळी येता आले नाही. पण लस घेतलेल्या तीन-चार डॉक्टरांशी माझे बोलणे झाले. त्यांनी कुठलेही साइड इफेक्ट नसल्याचे सांगितले. एका डॉक्टरला थोडासा ताप, कणकण होती.
मात्र, तिसऱ्या दिवसापासून ते ठणठणीत झाले. लसीकरणाचे ऍप राष्ट्रीय स्तरावरील आहे, त्यामुळे काही तांत्रिक अडथळे आहेत. कोणत्याही नवीन ऍपवर अडचणी येतातच, मात्र काही दिवसांनी सुरळीत होईल, असेही पवार यावेळी म्हणाले.
दरम्यान, पुणे शहर व जिल्ह्यात करोनाची संख्या अजूनही पुरेशा प्रमाणात कमी झालेली नाही, ही चिंतेची बाब आहे. ब्रिटन स्ट्रेनचे काही करोना रुग्ण आढळून आले आहेत, त्यामुळे काळजी घ्या, असे पवार म्हणाले.