पुण्यात 27 जानेवारीपासून नव्हे तर ‘या’ तारखेपासून वाजणार शाळेची घंटा

उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पुणे महापालिकेचा निर्णय

पुणे – शहरातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा येत्या 1 फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू होणार आहेत. राज्यशासनाने 27 जानेवारीपासून शाळा सुरू करण्यास परवानगी दिली होती. मात्र, त्यानंतरही प्रशासनाकडून पालकमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत शाळा सुरू करण्याबाबत विचारणा केली. त्यानंतर त्यांनी शाळा सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे. मात्र, शाळांची तपासणी, शिक्षकांची करोना चाचणी यासाठी काही कालावधी लागणार असल्याने प्रशासनाने 1 फेब्रुवारीपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

राज्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांनी करोनाबाबतच्या नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्याची दक्षता घ्यावी, अशी सूचना राज्य सरकारने केली आहे. मात्र, शहरातील करोनाची साथ तसेच इतर बाबी लक्षात घेता पालिका प्रशासनाकडून अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नव्हता. तसेच, या शाळा सुरू करायच्या की नाही याबाबत पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीत निर्णय घेण्याचे ठरविले होते. त्यानुसार शुक्रवारी पालकमंत्री पवार यांच्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली.

राज्य सरकारने अनलॉकचा निर्णय घेतला असून शाळाही सुरू करण्यास अडचणी नसल्याबाबत बैठकीत एकमत झाले. त्यानुसार 1 फेब्रुवारीपासून शाळा सुरू करण्याबाबत शिक्‍कामोर्तब करण्यात आले आहे. राज्य सरकारने जरी 27 जानेवारी रोजी शाळा सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी, शाळांना पूर्वतयारीसाठी वेळ मिळावा म्हणून पुणे महापालिका हद्दीतील हे वर्ग 1 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार आहेत.

महापालिका हद्दीतील इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग हे 1 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार आहेत. सर्व शाळांना तयारीसाठी वेळ मिळावा, तसेच शासनाने दिलेल्या आदेशांचे पालन व्हावे, यासाठी पुरेसा कालावधी देण्यात आला आहे. पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी संमतीपत्र देणे बंधनकारक आहे.
– रुबल अग्रवाल, अतिरिक्‍त आयुक्‍त, पुणे महापालिका 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.