पाथर्डी -बीज जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पारगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात शालन शहाजी भोसले ही वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे. रविवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. भोसले यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत आष्टी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात दोघांचा बळी गेला असून, अनेकांवर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने ग्रामस्थांत दहशतीचे वातावरण आहे.
रविवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास भोसले शेतातील गवत जनावरांसाठी घरी घेवून येत होत्या. यावेळी शेतात लपून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यात त्या गंभीर जखमा झाल्या आहेत. आष्टी तालुक्यातील मंगळूर येथे शनिवारी (दि.28) सायंकाळी दिंडेवस्तीवरील शेतात एक महिला तुरीच्या शेंगा तोडत असताना बिबट्याने या महिलेवर हल्ला करून तिला जखमी केले होते. ही घटना ताजी असतानाच आज सकाळी दुसरी घटना घडली आहे.
आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात आष्टी तालुक्यातील सुरुडी येथील नागनाथ गर्जे व किन्ही येथे स्वराज भापकर या दोघांचा मृत्यू झाला आहे. बिबट्याकडून हल्ले होत असल्याने आष्टी परिसरातील ग्रामीण भागात भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या एकूण सतरा टीम स्थापन झालेल्या असून, त्यामध्ये औरंगाबाद, अमरावती, नांदेड व इतर 1, अशा एकूण चार वन्यजीव व्यवस्थापनामध्ये तज्ज्ञ असणाऱ्या टीमचा ही समावेश असून, एकूण 80 कर्मचारी यात सक्रिय आहेत. तसेच आजूबाजूच्या गावांमध्ये या टीमद्वारे पेट्रोलिंग करून बिबट्याचा मागोवा घेण्याचे व सुरक्षितता बाळगण्यासाठी प्रबोधन करण्याचे काम सुरू आहे. परिसरात सहा पिंजरे लावले आहेत. उद्या आणखी दोन पिंजरे लावण्यात येणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.