नगर -पेमराज सारडा महाविद्यालयात सुरू असलेल्या भाजप कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळेत कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली. करोनाच्या काळात पक्षाने काय केले, यावरून हा गोंधळ झाला. पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मुकुंद देवगावकर व माजी सभापती नरेंद्र कुलकर्णी यांच्यात वाद पेटला. मात्र ज्येष्ठ नेत्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने त्यावर पडदा पडला.
सध्या भाजपचे पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जिल्हाभर कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरे सुरू आहेत. नगर शहरातील कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण आज आयोजित करण्यात आले होते. यामध्ये नगर शहरातील चारही मंडलांतील कार्यकर्त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. करोनाच्या भीतीने साधारणतः शंभरच्या आसपास कार्यकर्त्यांनी शिबिराला हजेरी लावली.
ज्येष्ठ नेते प्रा. मधुसूदन मुळे यांचे भाषण सुरू असताना कार्यकर्त्यांना बोलण्यासाठी संधी दिली जाणार आहे की नाही? असा सवाल मुकुंद देवगावकर यांनी केला. त्यानंतर सायंकाळी सात वाजता बोलण्यासाठी संधी दिली जाईल, असे त्यांना सांगण्यात आले. मात्र वेळेवरून चांगलीच खडाजंगी झाली. आम्ही करोनाच्या काळात खूप काम केले. पक्षाने काय काम केले, ते आधी सांगावे. पक्षामध्ये गुंड प्रवृत्तीचे लोक शिरले आहेत. ज्यांच्यावर गुन्हा दाखल आहेत, अशांना पदे दिली आहेत. त्यामुळे पक्षशिस्त बिघडली आहे. आणि तुम्ही मात्र पक्षशिस्त काय असते, हे शिकवता, असा सवाल देवगावकर यांनी करताच त्यांच्यावर अनेक पदाधिकारी तुटून पडले. त्यामध्ये नरेंद्र कुलकर्णी-देवगावकर यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली. त्यानंतर पक्षाच्या ज्येष्ठांनी मध्यस्थी केल्यानंतर वाद मिटला.