तिरुअनंतपुरम – देशातील करोना संकटाची तीव्रता अजूनही कमी झालेली नाही. दिवसेंदिवस देशातील रुग्णांची संख्या वाढत असून, प्रत्येक दिवसांला उच्चांकी रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे देशातील शैक्षणिक वेळापत्रक कोलमडून पडले आहे. अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत, तर विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेऊन काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
मात्र, केरळमध्ये घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेत 5 विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. तर सोशल डिस्टन्सिंग नियमांचा भंग केल्याप्रकरणी 300 विद्यार्थ्यांच्या पालकांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. परीक्षा केंद्रावर आपल्या मुलाला घ्यायला आलेल्या पालकांनी एकच गर्दी केली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.
दरम्यान, करोनाचा धोका कायम असतानाही परीक्षा घेण्यात आल्यामुळे राज्य सरकारला विरोधकांनी लक्ष्य केले आहे. परीक्षेला उपस्थित असलेले दोन विद्यार्थी बुधवारी करोना पॉझिटिव्ह निघाले. तर मंगळवारी (21 जुलै) तीन विद्यार्थी करोना पॉझिटिव्ह निघाले होते. ही परीक्षा 16 जुलै रोजी पार पडली होती. 88 हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यानंतर एका वर्तमानपत्रात बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर पोलिसांनी त्याची दखल घेत 17 जुलै रोजी गुन्हा दाखल केला होता.
करोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन अनेक राज्यांनी शैक्षणिक वर्षही उशिराने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानेही काही परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.
विशेषतः महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये करोनामुळे परिस्थिती चिंताजनक असल्याने राज्य सरकारने ऑनलाइन शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास सुरुवात केली आहे. तर विद्यापीठीय परीक्षांचा निर्णय अजूनही निश्चित झालेला नाही. विद्यापीठ अनुदान आयोगाने याविषयी सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या असल्या तरी राज्य सरकार मात्र, परीक्षा न घेण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसत आहे.