सर्वाधिक मृत्यू “अ’प्रभागात : “ड’ प्रभागात सर्वांत कमी रुग्ण आणि मृत्यू
पिंपरी – शहरामध्ये “अ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सर्वाधिक करोनाबाधित असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी रात्रीपर्यंत या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत परिसरात 801 उपचाराधीन करोनाबाधित रुग्ण होते. त्या खालोखाल “ई’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 774 सक्रिय रुग्ण होते.
शहरात मंगळवार (दि. 21) अखेर एकूण 12 हजार 180 करोनाबाधित रुग्ण होते. त्यातील 7 हजार 811 रुग्णांना आत्तापर्यंत उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. 4 हजार 136 उपचाराधीन रुग्ण आहेत. तर, 233 रुग्णांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. “अ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सर्वाधिक 801 करोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. 1 हजार 973 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर, 57 रुग्णांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. “ड’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सर्वात कमी 292 उपचाराधीन करोनाबाधित रुग्ण आहेत. 558 रुग्णांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तर, 9 रुग्णांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.
गावनिहाय विचार करता चिंचवडला सर्वाधिक 789 सक्रिय करोनाबाधित रुग्ण आहेत. 1 हजार 387 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 23 रुग्णांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. चिंचवड खालोखाल पिंपरी परिसरात 573 सक्रिय बाधित रुग्ण आहेत. 1 हजार 663 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. 64 रुग्णांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.
पिंपरी वाघेरे येथे मंगळवार अखेर सक्रिय बाधित रुग्ण शून्य होते. परिसरातील 10 करोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज दिलेला आहे. पुनावळे – 2, ताम्हाणेवस्ती – 1, संभाजीनगर – 2, ताथवडे – 4, पिंपळे निलख – 9 येथे खूपच अत्यल्प उपचाराधीन रुग्ण आहेत. किवळे येथे सध्या 50 उपचाराधीन रुग्ण आहेत. तर, पन्नाशीच्या आत सक्रिय रुग्ण असलेल्या परिसरांमध्ये रावेत (23), वाल्हेकरवाडी (44), बोपखेल (14), पिंपळे सौदागर (36), रहाटणी (35), तळवडे (26), नवी सांगवी (20), जुनी सांगवी (31), फुगेवाडी (18) आदी भागांचा समावेश आहे.