“हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मध्ये आलेलेही निगेटिव्ह; बारावा रुग्णही करोनामुक्त
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात संशयित म्हणून दाखल झालेल्या 47 जणांचे रिपोर्ट आज (शनिवारी) निगेटिव्ह आले आहेत. त्यामध्ये दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून आलेल्या नागरिकांच्या सहवासातील व्यक्तींचे देखील रिपोर्ट आहेत. तसेच पहिल्या बारापैकी बाराव्या रुग्णाचीही चाचणी निगेटिव्ह आले असून, त्याला आज घरी सोडले आहे. त्यामुळे शहरात आता दिल्लीतून आलेले दोन आणि त्यांच्या “हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील एक असे तीन करोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात 12 मार्च रोजी करोनाचे पहिले तीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर लागोपाठा बारा रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळले. त्यातील पहिले तीन रुग्ण 27 मार्च रोजी करोनामुक्त झाले. तर, 28 मार्च रोजी आणखी सहा रुग्ण करोनामुक्त झाले होते. त्यानंतर 31 मार्च रोजी एक आणि 2 एप्रिल रोजी एक असे दोन रुग्ण करोनामुक्त झाले. त्यानंतर पहिल्या बारापैकी शेवटच्या रुग्णांचे दुसरे रिपोर्टही आज शनिवारी (दि. 4) निगेटिव्ह आले. त्यामुळे या रुग्णाला घरी सोडण्यात आल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले.
दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी जमातच्या मर्कझमधील धार्मिक कार्यक्रमांतून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या 23 नागरिकांपैकी दोघांना करोनाची लागण झाल्याचे गुरुवारी (दि. 2) स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांच्या “हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील एकाला शुक्रवारी (दि. 3) करोनाची लागण झाल्याचे तपासणी अहवालातून स्पष्ट झाले. त्यामुळे शहरात आता करोनाचे तीन पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. संशयित म्हणून महापालिका रुग्णालयात दाखल झालेल्या 47 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर, दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून आलेल्या नागरिकांच्या सहवासातील सर्व व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आता “हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील पॉझिटिव्ह रुग्णाच्या नातेवाइकांचे रिपोर्ट येणे बाकी असल्याचे, महापालिकेने सांगितले आहे.
तीन रुग्णांची प्रकृती स्थिर
दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात आजपर्यंत करोना पॉझिटिव्ह 15 रुग्ण आढळले होते. त्यापैकी पहिले बारा रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तीन पॉझिटिव्ह रुग्णांवर महापालिका आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे.