वाघोली- करोनाचा फैलाव रोखण्यासाठी मागील अनेक दिवसांपासून ग्रामपंचायत व गावातील लोकप्रतिनिधी आटोकाट प्रयत्न करीत आहे. करोना प्रतिबंधक उपाययोजना युद्धपातळीवर सुरू आहेत. गरजू 5 हजार नागरिकांच्या जेवणाची सोय करण्यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी दानशूर व्यक्तींच्या मदतीने सुरुवात केली आहे.
कोरोनाग्रस्त पेशंट वाघोली परिसरामध्ये सद्यस्थितीत आढळून आलेला नसला तरी विषाणूंचा फैलाव रोखण्यासाठी वाघोली ग्रामपंचायत व वाघोलीतील लोकप्रतिनिधी आटोकाट प्रयत्न करीत आहेत. ग्रामपंचायतीकडून प्रतिबंधक उपाययोजना युद्धपातळीवर केल्या जात आहेत. घरोघरी जाऊन कुटुंबाचे सर्व्हेक्षण केले जात आहे.
सोसायटीतील चेअरमन व सचिवांनी देखील यामध्ये सहभाग दर्शविला आहे. गरजूंना डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध दिले जात आहे, वॉर्ड, सार्वजनिक ठिकाणी, ग्रामपंचायत सदस्यांच्या मदतीने सोडियम हायपोक्लोराईड औषध फवारणी केली जात आहे. महामार्गावर दोन्ही बाजूंनी प्रतिबंधित क्षेत्राचे बॅनर लावले आहेत.
ज्या ठिकाणी क्वारंटाइन केलेल्या व्यक्तींच्या परिसरामध्ये व बॅंक परिसर, वाहनांवर औषध फवारणी केली जात आहे. दवाखाने सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. काही दवाखाने सुरू झाले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका चालक, सुरक्षा कीटचा साठा करून दिला आहे. दरमहाचे मानधनावर डॉक्टर्स उपलब्ध करून दिले आहेत.
रक्तदानाचे नियोजन केले जाणार आहे, क्वारंटाइनसाठी बीजेएस हॉस्टेल, आयुर्वेदिक कॉलेजच्या इमारतींची पाहणी केली आहे. मजुरांना अन्नधान्य देण्यासाठी नोंदणी करण्याचे नियोजन केले आहे. आपत्कालीन व्यवस्थापनमध्ये गावातील आजी माजी पदाधिकारी, ग्रामस्थांचा सहभाग आहे.
स्थलांतरितांसाठी तात्पुरत्या छावण्या वाघोली येथील स्थलांतरित कामगार व बेघरांसाठी कल्याण मंगल कार्यालयात तात्पुरत्या निवारा छावणीची उभारणी केली आहे. यामध्ये आत्तापर्यंत 68 गरजूंची सोय करण्यात आली आहे. पोलिसांच्या मदतीने त्यांना जेवण, पाणी पुरविण्याचे काम वाघोली ग्रामपंचायतीच्या वतीने केले जात आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने वाघोलीतील प्रत्येक कुटुंबाचे सर्व्हेक्षण करण्याचे काम सध्या सुरू आहे.