लोकसभा विसर्जित करण्याचा सल्ला
नवी दिल्ली, दि. 18 – मार्च महिन्यात लोकसभेची निवडणूक घेण्याची घोषणा पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केली आहे. देशाला उद्देशून आकाशवाणीवर आज रात्री केलेल्या भाषणात इंदिरा गांधी म्हणाल्या, सध्याची लोकसभा विसर्जित करावी, अशी शिफारस आपण राष्ट्रपतींना केली आहे.
सध्याची लोकसभा आणखी 15 महिने जरी अस्तित्वात राहू शकत असली तरी संसदीय सरकारने जनतेला आपल्या कामाचा अहवाल दिला पाहिजे. निवडणूक मार्च महिन्यात होण्याची अपेक्षा आहे.
“आगामी’ लोकसभेत 542 सदस्य असतील
नवी दिल्ली – मार्च 77 मधील लोकसभेची निवडणूक झाल्यावर 6व्या लोकसभेत 542 निर्वाचित सदस्य असतील. त्यापैकी 525 सदस्य राज्यांतून व 17 केंद्रशासित प्रदेशातील असतील. विसर्जित झालेल्या 5व्या लोकसभेत 513 निर्वाचित सदस्य होते. 1973 साली मंजूर झालेल्या घटनेच्या 31व्या दुरुस्तीप्रमाणे जागा वाढविण्यात आल्या आहेत.
रशियन रेडिओ व टीव्हीवर बातमी प्रसारित
मॉस्को – भारतातील लोकसभा विसर्जनाची घोषणा रशियात दोन वेळा प्रसारित केली.