तिळगूळ घ्या… आणि कार्यरत राहा!
मुंबई, दि. 13 – ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष बिंदुमाधव जोशी व सचिव सूर्यकांत पाठक यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांची मंत्रालयात भेट घेऊन महाराष्ट्रात ठिकठिकाणी सुरू झालेल्या ग्राहक पंचायतीच्या कार्याची आणि ध्येयधोरणाची माहिती दिली.
“गेले दोन वर्षे प्रत्यक्ष काम उभे केल्यानंतर आम्ही आपली भेट घेऊन हे कार्य पाहण्यासाठी पुणे भेटीचे निमंत्रण देत आहोत’, असे म्हणून बिंदुमाधव जोशी आणि सूर्यकांत पाठक यांनी “महाराष्ट्रातील ग्राहकांचा हा तिळगूळ घ्या अन्…’ असे म्हणताच मुख्यमंत्र्यांनी आदराने तिळगुळाचा स्वीकार करीत म्हटले, “…अन् असेच कार्यरत राहा. निव्वळ गोड बोलण्याने काय होणार?’
राजकन्या आणि कायदा
लंडन – ब्रिटनच्या राजकुमारी आणि तिचे पती कॅप्टन फिलिप्स कुठल्या तरी समारंभास चालले होते. ऍन मोटार चालवीत होती अतिशय वेगाने! तिच्या मोटारीचा वेग दरताशी 140 किमी होता. पोलिसांच्या गस्ती तुकडीच्या हा गुन्हा लक्षात आला आणि वेगमर्यादेचे उल्लंघन केले म्हणून तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. हा खटला आता 21 तारखेला सुरू होणार आहे.
राणी एलिझाबेथची ऍन ही कन्या. गुन्हा काय तर वेगमर्यादेचे उल्लंघन केले. पण तरीही तिच्या विरुद्ध गुन्हा नोंदवून कोर्टात खटला भरला जातो, हे विशेष आहे. कायद्यासमोर सर्व सारखे म्हणतात. पण हे म्हणणे अनेकदा पुस्तकातच राहते. पण इंग्लंडमध्ये त्याची अंमलबजावणी होते हे विशेष! भारतात तर नेमके याउलट दिसून येते. बड्यांना सूट आणि गरिबांना दंड असा येथे प्रकार आहे.