प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 11 -विघ्नहर्ता न्यासने अहोरात्र वैद्यकीय सेवा पुरवली असून 347 रुग्णांना त्यांनी वैद्यकीय सेवा पुरवली आहे. या कार्यात 130 स्वयंसेवक होते. यामध्ये डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय, मदतनीस, रुग्णवाहिका यांचा समावेश होता.
347 रुग्णांपैकी 12 रुग्णांना अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील एकाला हृदयविकाराचा झटका आला होता. त्याला तातडीने आपत्कालिन वैद्यकीय उपचार देऊन रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे त्याचा जीव वाचला. प्रामुख्याने गर्दीमुळे, उन्हामुळे अति घाम आल्यामुळे चक्कर येणे, अति आवाजामुळे लहान मुलांचे कान दुखणे, गर्दीमध्ये पडल्यामुळे दुखापत होणे, रक्तदाब वाढल्यामुळे चक्कर येणे, शुगर डाऊन झाल्यामुळेही चक्कर येणे अशा रुग्णांची संख्या जास्त होती.
विघ्नहर्ता न्यास चे वैद्यकीय सेवा प्रमुख डॉक्टर मिलिंद भोई यांच्या नेतृत्त्वाखाली डॉ. नंदकुमार बोरसे, डॉ. नितीन बोरा, डॉ. कुणाल कामठे, डॉ.शंतनु जगदाळे, डॉ. प्रीती विक्टर, डॉ. कैवल्य सूर्यवंशी, सदाशिव कुंदेन, जयशंकर माने, अशोक दोरूगडे, दिनेश मुळे, जयवंत जानुगडे यांनी सहकार्य केले. याशिवाय शेट ताराचंद रुग्णालय पुणे, टिळक आयुर्वेद महाविद्यालय, रोटरी क्लब, कात्रजकर ऍम्बुलन्स, माय माऊली वृद्धाश्रम यांनीही सहकार्य केले.
106 जणांना “बीव्हीजी’ची रुग्णवाहिका सेवा
बीव्हीजीच्या 108 या हेल्पलाइनवर आलेल्या कॉलनुसार मिरवणुकीत 106 जणांना रुग्णवाहिका सेवा पुरविण्यात आली. यात 5 अपघात, 1 हृदयविकार झटका, 3-पडणे, अन्य वैद्यकीय मदत-67, अन्य 16, आघात-14 इतक्या जणांना रुग्णवाहिका पुरविण्यात आली. त्यामुळे अनेकांना तातडीने उपचार मिळण्यास मदत झाली.