सोसायट्या, रस्ते पाण्याखाली; नागरिकांची त्रेधा
मुलभूत सुविधा पुरविण्याची आश्वासने गेली वाहून
पुणे, दि. 11 – शहरासह उपनगरांत रविवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. यामुळे पावसाळ्यापूर्वी केलेल्या नालेसफाई आणि मलवाहिन्या दुरुस्तीचे पितळ पुन्हा उघडे पडले. तर, ठिकठिकाणी पाणी साचल्याने रात्री उशिरापर्यंत भीषण वाहतूक कोंडी झाली होती. उतारावर असलेल्या सोसायट्यांच्या आवारात पाणी शिरल्याने वाहने पाण्याखाली गेली. तर, वस्त्यांमध्येही रहिवाशांची तारांबळ उडाली. तर, रविवार असल्याने खरेदीसाठी निघालेल्या कुटुंबांना या पावसाचा तडाखा सहन करावा लागला.
यात औंध, बाणेर-बालेवाडी, पाषाण, सूस गाव, शहरालगतचा सांगवीचा भाग, सिंहगड रस्ता, धायरी, नऱ्हे, आंबेगाव, कात्रज, धनकवडी, अरण्येश्वर, वारजे, कर्वेनगर, कोथरूड, चांदणी चौक, बिबवेवाडी, सहकारनगर, हडपसर, वानवडी, कॅन्टोन्मेंट हद्द, लष्कर, येरवडा, धानोरी, विश्रांतवाडी, विमाननगर, चंदननगर, खराडी, मुंढवा, मांजरी, फुरसुंगी, उरुळी देवाची, उंड्री-पिसोळी, कोंढवा आदी भागांतील रस्ते पाण्याखाली होते. तर, साचलेल्या पाण्याचा निचरा होत नसल्याने नागरिक वैतागले होते. काही ठिकाणी युवकांनी पुढाकार घेऊन पाण्याला रस्ता करून दिला.