पिंपरी – शारदीय नवरात्री उत्सवानिमित्त वल्लभनगर आगारातून साडेतीन शक्तीपीठ दर्शनासाठी देवीच्या भक्तींची सोय व्हावी म्हणून राज्य एसटी महामंडळाच्या वतीने तीन बस सोडण्यात आल्या होत्या. त्यातून 3 लाख 7 हजार 292 रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यात सवलतीद्वारे 96 हजार339 तर, विनासवलत 2 लाख 10 हजार 953 रुपयांचा समावेश आहे.
राज्यातील साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन पिंपरी चिंचवड शहरातील देवीच्या भक्तांना घेता यावे, यासाठी वल्लभनगर आगारातून साडेतीन शक्तीपीठ दर्शन यात्रा ही एसटी बस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यात दोन लाल परी व एक हिरकणी बस अशा तीन एसटी बसचा समावेश होता.
चार दिवसांची शक्तीपीठ दर्शन यात्रा होती. प्रवाशांसाठी आरक्षणासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच प्रतिव्यक्ती भाडे 2700 रुपये होते. ऑनलाइन व ग्रुप बुकिंगची सोय होती. या चार दिवसांच्या यात्रेत पहिल्या दिवशी 18 ऑक्टोबरला कोल्हापूर येथील महालक्ष्मीचे दर्शन घेऊन त्याच दिवशी तुळजापूर येथील तुळजा भवानी दर्शन व रात्रीचा मुक्काम, दुसऱ्या दिवशी माहूर येथे रेणुका माता दर्शन घेऊन माहूर येथे दुसरा मुक्काम तर, तिसऱ्या दिवशी वणी येथी सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन 21 ऑक्टोबरला ही बस परत आली.
सवलतीचाही समावेश
वल्लभनगर आगारातून नवरात्रीनिमित्त साडेतीन शक्तीपीठ दर्शन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. 18 ते 21 ऑक्टोबर या कालावधीत ही सेवा पुरविण्यात आली होती. त्यात महिलांचाही मोठा वाटा होता. या उपक्रमातून आगाराला 3 लाख 7 हजार 292 रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यात सवलतीद्वारे 96 हजार339 तर, विनासवलत 2 लाख 10 हजार 953 असे असून 3 लाख 7 हजार 292 रुपयांचे उत्पन्न आगाराला मिळाले.