एकूण करोना बळी 545 तर बाधितांची संख्या 26 हजार पार
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात करोनाने हाहाकार उडविला असून, तपासणीच्या तुलनेत बाधितांमध्ये रोजच भर पडत आहे. रुग्णांची संख्या वाढत असताना मयतांचे प्रमाणही वाढले असून, आज उपचार सुरू असताना तब्बल 24 करोनाबाधितांचा बळी गेला आहे. तर 1012 बाधितांची नव्याने भर पडली आहे. त्यामुळे मृतांची संख्या 545 वर पोहोचली आहे. एकूण बाधितांची संख्या 26 हजार 118 वर पोहोचली आहे.
बुधवारी प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांचा अहवाल आज (गुरुवारी) महापालिकेला प्राप्त झाला. आजच्या अहवालानुसार शहरातील 1012 जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर करोनाची बाधा झाल्याने उपचार सुरू असलेल्या तब्बल 24 जणांचे निधन आज दिवसभरात झाले आहे. यामध्ये शहरातील 21 जणांचा तर शहराबाहेरील 3 जणांचा समावेश आहे. मयतांमध्ये किवळे, पिंपरी, चिंचवड, भोसरी, कासारवाडी, थेरगाव, मोशी, निगडी, नेहरूनगर, रुपीनगर, चऱ्होली येथील नागरिकांचा समावेश असून, शहराबाहेरील नारायणगाव, येरवडा आणि शिरूर येथील प्रत्येकी एका रहिवाशाचे मृत्यू झाले आहे.
आतापर्यंत शहरातील 17673 जण करोनामुक्त झाले असून शहराबाहेरील 1104 जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. आज दिवसभरात करोनाची कोणतीही लक्षणे न आढळल्यामुळे 266 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 1 लाख 14 हजार 777 जणांच्या घशातील स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 86,956 जणांचे अहवाल नकारात्मक आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 1703 जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. आज नव्याने संशयित असलेले 1801 जण महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये दाखल झाले आहेत. तर शहरातील 4175 आणि शहराबाहेरील 342 जणांवर पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.