बिहार पोलीस प्रमुखांनी दिला कायेदशीर कारवाईचा इशारा

त्या राज्यातील अधिकारी मुंबईत क्वारंटाईनमध्ये

पाटणा – मुंबईत तपासासाठी आलेल्या आयपीएस अधिकाऱ्याला क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आल्यावरून बिहारचे पोलीस प्रमुख गुप्तेश्‍वर पांड्ये यांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला. संबंधित अधिकाऱ्याला गुरूवार संपेपर्यंत सोडण्याची मुदत देताना पांड्ये यांनी कायदेशीर कारवाईचा इशारा दिला.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासासाठी बिहार पोलिसांचे एक पथक काही दिवसांपूर्वी मुंबईत दाखल झाले. त्या तपासावर देखरेख ठेवण्यासाठी आयपीएस अधिकारी असणारे पूर्व पाटण्याचे पोलीस अधीक्षक विनय तिवारीही रविवारी पोहचले.

मात्र, त्यांना मुंबई पालिका अधिकाऱ्यांनी नियमांनुसार 15 ऑगस्टपर्यंत होम क्वारंटाईनला सामोरे जाण्यास सांगितले. त्यासाठी त्यांना गोरेगावच्या एसआरपीएफ विश्रामगृहात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे बिहार पोलिसांच्या पथकातील इतर सदस्य परतले तरी तिवारी मुंबईतच अडकून पडले आहेत.

त्यामुळे बिहारचे पोलीस प्रमुख पांड्ये यांनी पत्रकारांशी बोलताना आक्रमक भूमिका मांडली. तिवारी यांना अप्रत्यक्षपणे नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. त्यांना सक्तीच्या क्वारंटाईनमधून सोडण्याबाबत मुंबई पालिका अधिकाऱ्यांकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही, असा आरोप त्यांनी केला. न्यायालयात जाण्याच्या पर्यायाचा विचार करण्याचे सूतोवाच त्यांनी पुढे बोलताना केले.

Leave A Reply

Your email address will not be published.