धुळे – नोवेल करोना विषाणूने थैमान घातलेल्या चीनमध्ये धुळे जिल्ह्यातील दोन तरुण अडकले आहेत. धुळे शहरातील गिरीश पाटील आणि शिंदखेडा तालुक्यातील पथारे येथील चंद्रदीप जाधव अशी या दोघांची नावे आहेत.
हे दोन्ही तरुण चीनमधील वुहान शहरात अडकले आहेत. तांत्रिक अडचणीमुळे आपल्याला भारतात सध्या परतता येत नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे. दोघांना बॅटरी संशोधनासाठी फेलोशिप मिळाली असून चीनमधील वुहान शहरात ते वास्तव्यास आहेत. नोव्हेंबर 2019 मध्ये ते चीनमध्ये गेले होते.
आम्ही येथे सुरक्षित आहोत. कुठलीही चिंता करण्याचे कारण नाही. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे सध्या आम्हाला भारतात परतता आलेले नाही, असे या तरुणांनी कळविले आहे. राज्य सरकारच्या यंत्रणेशीही संपर्कात असल्याचे या तरुणांनी कळविले आहे.