सोफिया केनिन: महिला टेनिसची नवी तारका

शनिवारी पार पडलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत अमेरिकेची 21 वर्षीय सोफिया केनिन विजेती ठरली. अंतिम फेरीत तिने स्पेनच्या गार्बीने मुगुरुझावर तीन सेटमध्ये (4-66-26-2) विजय मिळवला. सोफियाचे हे पहिलेच ग्रॅंडस्लॅम विजेतेपद आहे.

रशियात जन्मलेल्या सोफियाचे आईवडील तिच्या जन्मानंतर अमेरिकेत स्थलांतरीत झाले. आपल्या वडिलांकडून टेनिसचे बाळकडू मिळालेल्या सोफियाने वयाच्या पाचव्या वर्षी टेनिसचे धडे गिरवायला सुरुवात केली. तिच्या अमेरिकेतील घरासमोरील ड्राइव्हवे भरपूर मोठा असल्याने तिथे टेनिस खेळायला भरपूर जागा होती. आपली मुलगी प्रचंड गुणवान आहे हे लक्षात यायला तिच्या वडिलांना फारसा वेळ लागला नाही. त्यांनी लगेचच तिच्यासाठी प्रशिक्षक शोधायला सुरुवात केली. रिक मेसीच्या रुपात सोफियाला नवा प्रशिक्षक लाभला. रिककडे विल्यम्स भगिनी, अँडी रॉडीक, मारिया शारापोवा यांनीदेखील प्रशिक्षण घेतले आहे. उपजतच गुणवत्ता असलेल्या सोफियाने लहान वयातच साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. रिक तिचा उल्लेख ‘डास’ असा करतो. डास जसा आपण सतत हाकलून लावल्यानंतरही पुन्हापुन्हा येऊन आपल्याला चावण्याचा प्रयत्न करतो तशीच सोफियादेखील आहे असे तो म्हणतो. कुठल्याही परिस्थितीत मागे न हटता सतत विजयासाठी प्रयत्न करण्याची तिची वृत्ती रिकच्या मनात भरली. पुढच्या काही वर्षांत सोफियाने अमेरिकेतील 12, 14, 16 आणि 18 वर्षाखालील वयोगटांत अग्रस्थान मिळवत आपले नाणे खणखणीत वाजवले.

अमेरिकेतील ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपचे विजेतेपद मिळवत 2015 च्या यूएस ओपनसाठी तिने वाईल्ड कार्ड मिळवले. त्यानंतर सलग दोन वर्षे 2016-17 मध्येही तिने यूएस ओपनच्या मुख्य ड्रॉमध्ये स्थान मिळवले. सोफियासाठी आंतरराष्ट्रीय टेनिसमधील “अच्छे दिन’ 2018 मध्ये आले. या वर्षाअखेरीस तिने जागतिक क्रमवारीत पहिल्या पन्नासात स्थान मिळवले. पुढच्या वर्षी 2019 च्या फ्रेंच ओपनमध्ये तिने सेरेना विल्यम्सला हरवत सगळ्यांना आश्‍चर्याचा धक्का दिला. याच वर्षात तिने नेओमी ओसाका, ऍश्‍ले बार्टी, मॅडिसन कीज, व्हिक्‍टोरिया अझारेंका यांच्यासारख्या नामांकित खेळाडूंना नमवत आपण ‘वन मॅच वंडर’ नाही हे दाखवून दिले. याचवर्षी तिला डब्ल्यूटीए (थढअ) चा “मोस्ट इम्पृव्हड प्लेअर’ हा पुरस्कार देखील मिळाला.

अंगापिंडाने तशी लहान दिसणाऱ्या सोफियाचा खेळ मात्र प्रचंड आक्रमक आहे. अनेकदा आपल्या जोरदार बॅकहॅंडने ती प्रतिस्पर्ध्याला चकित करते. बेसलाईनच्या मागून उत्तम खेळ करणारी सोफिया नेटजवळसुद्धा तितकाच परिणामकारक खेळ करते. तिचे ड्रॉप शॉट तुफान आहेत. हे सगळे वयाच्या 21 वर्षात आत्मसात करणाऱ्या सोफियाकडे स्वतःला सिद्ध करण्यासाठी अजून बरीच वर्षे शिल्लक आहेत.

आई झाल्यावर पुनरागमन करणारी सेरेना आणि व्हीनस विल्यम्सला हरवत टेनिसविश्‍व हादरवून सोडणारी कोको गॉफ या दोघी अमेरिकन खेळाडूंनी गेल्या वर्षी बऱ्यापैकी लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. त्यामुळे सोफियाकडे मीडियाचे काही प्रमाणात दुर्लक्ष झाले. आता ऑस्ट्रेलियन ओपन जिंकत निदान यावर्षी तरी मीडियाचे आपल्याकडेही लक्ष राहील हे तिने नक्की केले आहे.

महिलांच्या ग्रॅंडस्लॅम स्पर्धा आणि नव्या विजेत्या हे काही नवे नाही. गेल्या सतरा ग्रॅंडस्लॅम स्पर्धांमध्ये तब्बल 11 वेगवेगळ्या महिलांनी विजेतेपद मिळवले आहे. गेल्या चार वर्षांत झालेल्या ग्रॅंडस्लॅम स्पर्धांमध्ये एक नेओमी ओसाका सोडली तर बाकी कुणालाही सलग दोन ग्रॅंडस्लॅम स्पर्धा जिंकता आलेल्या नाहीत. एवढी तीव्र स्पर्धा असताना 2020 मधील इतर तीन ग्रॅंडस्लॅम स्पर्धांमध्ये सोफिया कशी कामगिरी करते याकडे सगळ्यांचेच लक्ष असेल.

-आदित्य गुंड

Leave A Reply

Your email address will not be published.