राज्यात करोनाचे 17 नवीन रुग्ण

एकूण रुग्ण संख्या 220 वर ! 

मुंबई (प्रतिनिधी) – राज्यात करोनाच्या 17 नविन रुग्णांची नोंद आज झाली असून, 2 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. नवीन रुग्णांमध्ये 8 रुग्ण मुंबईचे असून, पुण्यात 5, नागपूरमध्ये 2 व नाशिक आणि कोल्हापूर येथील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 220 झाली आहे. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना, करोना आजारातून बरे झालेल्यांची संख्याही वाढते आहे. आजवर 39 रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले आहे. राज्यात 171 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यात आज 2 करोनाबाधित रुग्णांचे मृत्यू झाले. एका 78 वर्षीय पुरुषाचा मुंबईतील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला, त्यांना उच्च रक्तदाब आणि हृदयरोग हे इतर आजारही होते. तर करोना बाधित असलेल्या 52 वर्षीय पुरुषाचा पुण्यातील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होता. राज्यातील करोना बाधित मृत्यूची संख्या आता 10 झाली आहे.

39 जणांना घरी सोडले तर 10 जणांचा मृत्यू ! 
राज्यात आज एकूण 328 जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. 18 जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत 4538 जणांना भरती करण्यात आले. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी 3876 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 220 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 19 हजार 161 व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून 1224 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.