ड्युटीवर परतण्यासाठी पोलिसाची तब्बल 20 तास पायपीट

भोपाळ -ड्युटीवर परतण्यासाठी एका पोलीस कॉन्स्टेबलने तब्बल 20 तास पायपीट केली. करोना संकटात कर्तव्याला प्राधान्य देणारा संबंधित 22 वर्षीय पोलीस सर्वांच्याच कौतुकाचा विषय बनला आहे.

दिग्विजय शर्मा या तरुण पोलीस कॉन्स्टेबलच्या पायी प्रवासाची सध्या मोठी चर्चा होत आहे. शर्मा मूळचे उत्तरप्रदेशचे रहिवासी आहेत. मात्र, पोलीस कॉन्स्टेबल म्हणून ते मध्यप्रदेशच्या राजगढमध्ये रूजू आहेत.

नोकरी करतानाच ते कला शाखेचे (बीए) शिक्षणही घेत आहेत. बीएची परीक्षा देण्यासाठी त्यांनी आठवडाभराची रजा घेऊन उत्तरप्रदेशचे इटावा गाठले. मात्र, करोना फैलावाच्या पार्श्‍वभूमीवर ती परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली. त्यामुळे शर्मा यांनी ड्युटीवर पुन्हा रूजू होण्याचा निर्णय घेतला. मात्र, देशव्यापी लॉकडाऊनमुळे वाहतूक बंद आहे. वाहनांची सोय नसल्याने घरीच थांबण्याचा सल्ला त्यांना त्यांच्या पोलीस ठाण्यातील वरिष्ठांनी आणि कुटुंबीयांनीही दिला.

मात्र, सध्याच्या अवघड काळात ड्युटीवर हजर राहण्याचा निर्णय शर्मा यांनी घेतला. अर्थात, इटावा ते राजगढ असा सुमारे 450 किलोमीटरचा पल्ला गाठण्याचे आव्हान त्यांच्यापुढे होते. मागचा-पुढचा विचार न करता त्यांनी 25 मार्चला (बुधवार) सकाळी पायी प्रवास सुरू केला. शक्‍य होईल तिथे त्यांनी दुचाकीस्वारांकडे लिफ्ट मागून बरेच अंतर कापले. तरीही जवळपास 20 तास त्यांना चालावे लागले.

अखेर 28 मार्चला (शनिवार) रात्री ते राजगढमध्ये पोहचले. मोठी पायपीट केल्याने त्यांचे पाय दुखू लागले. त्यामुळे वरिष्ठांनी त्यांना एक-दोन दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. दरम्यान, पायी प्रवास करताना खाण्यासाठी काहीच न मिळाल्याने शर्मा यांना एक दिवसाचा उपवास घडला. मात्र, नंतर काही सामाजिक संस्थांमुळे त्यांच्या खाण्याची व्यवस्था झाली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.