निवडणुकीसाठी 140 गाड्या, तीन हजार पोलिसांची मागणी 

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालयाकडून महासंचालकांना साकडे

पिंपरी – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालयाची ही पहिलीच लोकसभा निवडणूक आहे. भल्या मोठ्या विस्तारात अपुऱ्या मनुष्यबळावर आयुक्‍तालय सध्या कसरत करत आहे. त्यामुळे आयुक्‍तालयाने खास निवडणुकीसाठी पोलीस महासंचालकाकडून 140 गाड्या, 3 हजार 168 पोलीस दल तर 8 राखीव दलाची पथके मागवली जाणार आहेत.
मावळ आणि शिरूर लोकसभेचे मतदान चौथ्या टप्प्यात होणार आहे. त्यामुळे ऐन निवडणूक काळात आयुक्‍तालयाकडून उपलब्ध मनुष्यबळात काम सुरू आहे. मात्र मतदानाच्यावेळी आयुक्‍तालयाला अतिरिक्‍त मनुष्यबळाची गरज भासणार आहे. आयुक्‍तालयाच्या हद्दीत मावळ व शिरूर मतदारसंघ येत असून 365 मतदान केंद्रे आहेत.

यामध्ये 1 हजार 671 बूथचा समावेश आहे. तर 41 मतदान केंद्रे ही निवडणूक आयोगाच्या सर्वेक्षणात संवेदनशील ठरले आहेत. सद्यस्थितीत केवळ पोलीस आयुक्‍त, अप्पर पोलीस आयुक्‍त, तीन पोलीस उपायुक्‍त, 8 सहायक पोलीस आयुक्‍त, 53 पोलीस निरीक्षक, 39 सहायक पोलीस निरीक्षक, 156 पोलीस उपनिरीक्षक तर 1 हजार 804 पोलीस कर्मचारी उपलब्ध असून यातील 80 टक्के मनुष्यबळ हे निवडणुकीच्या कामामध्ये गुंतले आहे.

पोलीस आयुक्‍त आर.के. पद्मनाभन यांनी पोलीस महासंचालक यांच्याकडे 140 गाड्या मागवल्या आहेत. यामध्ये 110 जीप किंवा सुमो गाड्या, 30 बस यांचा समावेश आहे. गाड्याबरोबरच अतिरिक्‍त मनुष्यबळही आवश्‍यक आहे. यासाठी 3 हजार 168 मनुष्यबळाची मागणी करण्यात आली असून यामध्ये तीन पोलीस आयुक्‍त, 6 सहायक पोलीस आयुक्‍त, 20 पोलीस निरीक्षक, 20 सहायक पोलीस निरीक्षक, 20 पोलीस उपनिरीक्षक तर 2 हजार 127 पोलीस कर्मचारी तसेच 972 होमगार्ड यांची मागणी करण्यात आली आहे. तर राज्य राखीव दलाच्या 5 तर केंद्रीय राखीव दलाची 3 अशी आठ राखीव पथके मागवली आहेत. गाड्या व मनुष्यबळाबरोरबरच 200 वॉकी टॉकी तर 64 वायरलेस मागवले आहेत. काही गाड्या, होमगार्ड हे आयुक्‍तालयात दाखल झाले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.