…तर वाढेल तीन महिन्यांचा पाणीसाठा

आजचा उपयुक्‍त पाणी साठा -37 टक्‍के 12 दशलक्ष घनमीटर पाण्यावर गदा ः पवना धरणाचे मजबुतीकरण रखडले
धरणातील पाणी साठ्याची सद्यस्थिती
आजच्या दिवशीचा गतवर्षीचा साठा 44.35 टक्‍के
उपयुक्‍त पाणीसाठा 3.15 टीएमसी

45 वर्षांत पहिल्यांदाच काढला गाळ
मागील सलग दोन वर्षांत खासदार निधीतून 75 हजार क्‍युबिक मीटर गाळ काढण्यात आला आहे. यामुळे सात कोटी 60 लाख लिटर पाणी साठविण्याची क्षमता वाढली आहे. पवना धरणातील गाळ गेल्या 45 वर्षांत काढला गेला नाही. गाळ काढण्यात आल्यामुळे धरणाची साठवण क्षमता सात कोटी लाख लिटरने वाढली आहे. गाळ काढण्यात सातत्य राहिले तसेच धरणाचे मजबुतीकरण झाल्यास पाण्याचा टक्का वाढेल, अशी अपेक्षा पाटबंधारे खात्याकडून व्यक्त होत आहे.

पिंपरी – पिंपरी-चिंचवडकरांची भिस्त असलेल्या पवना धरणातील पाणी पातळी कमालीचा घटत चालल्याने शहरवासीयांची चिंता वाढली आहे. गेली तीन वर्षे पवना धरणातील गाळ काढण्यात आल्याने शहरवासीयांची पाणी कपात आठवड्यातून एक दिवसावर निभावली आहे. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून पवना धरणाच्या मजबुतीकरणाचा प्रश्‍न रखडला आहे. धरणाचे मजबुतीकरण झाल्यास 12 दशलक्ष घनमीटर पाणी साठा वाढणार आहे. हा पाणी साठा तीन महिने पुरेल इतका आहे. त्यामुळे धरणाच्या मजबुतीकरणाची मागणी जोर धरु लागली आहे.

पवना धरण मावळवासीयांसह पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागवते. जलसंपदा विभागाने निर्बंध आणल्यामुळे महापालिका सद्यस्थितीला दररोज 440 एमएलडी पाण्याचा उपसा करते. रावेत बंधाऱ्यातून पाणी उपसा केला जातो. धरणातून बंधाऱ्यापर्यंत पाणी येईपर्यंत त्यात घट होते. त्यामुळे थेट जलवाहिनीद्वारे पाणी आणण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेने घेतला होता. प्रत्यक्षात कामाला सुरुवात देखील झाली होती. मात्र, मावळातील शेतकऱ्यांचा त्यास विरोध होता. यामध्ये चार शेतकऱ्यांचा हकनाक बळी गेला. त्यानंतर हे काम बंद पडले आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रवीष्ठ असून महापालिकेचे कोट्यावधी रुपये “पाण्यात’ जाण्याची भीती आहे.

एकीकडे पवना बंद जलवाहिनीचे भिजत घोंगडे असताना दुसरीकडे धरणाचे मजबुतीकरण रखडले आहे. मजबुतीकरण झाल्यास धरणात 12 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा वाढू शकतो. हा पाणी साठा जवळपास तीन महिने पुरेल इतका आहे. धरणाच्या मजबुतीकरणाचे काम 2004 मध्ये सुरू करण्यात आले. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुरुवातीला अर्थसहाय्य केले. पाणीपट्टीतून ते वसूलही करण्यात आले. मात्र, 2008 मध्ये मावळातील शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर हे काम थांबविले. मजबुतीकरणामध्ये अस्तरीकरण, डागडुजी, देखभाल दुरुस्ती, पाण्याची गळती रोखणे आदी कामांचा समावेश होता. मावळ परिसरातील शेतकऱ्यांच्या विरोध आणि जलसंपदा खात्याचा निधी उपलब्ध नसल्याने हात आखडता घेतल्यामुळे धरण मजबुतीकरणाचे काम लांबणीवर पडले आहे. त्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपनेही अनास्था दाखविली आहे.

पवना धरणाचे मजबुतीकरण रखडल्याने सध्या संकल्पित साठ्यापेक्षा कमी पाणी साठा होत आहे. मजबुतीकरण झाले तर तीन महिन्यांचा अधिकचा साठा करु शकतो. त्यामुळे सुमारे अर्धा टीएमसी एवढा पाणीसाठा वाढेल. शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न रखडल्याने ही बाब न्यायप्रवीष्ठ आहे. मजबुतीकरणाच्या कामास विलंब झाल्याने मजबुतीकरणावरील खर्चातही वाढ होणार आहे.

– ए. एम. गडवाल, शाखा अभियंता, पवना धरण.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.