पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहर आणि ग्रामीण भागात सार्वजनिक वाहतुकीची सेवा देणाऱ्या पीएमपीच्या प्रवासी दिनाकडे प्रवाशांनी पाठ फिरवली असून पिंपरी चिंचवड शहरातील तीन आगारांमध्ये मिळून केवळ एकच सूचना प्राप्त झाली आहे. यातून या दिनाचे महत्त्व काहीच नसल्याचे दिसून आले आहे.
पीएमपीच्या वतीने सूचना, तक्रारी, हरकती यासह बस सेवांमध्ये सुधारणा करण्याबाबत नागरिकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी प्रवासी दिनाचे आयोजन केले जाते. या शुक्रवारी (दि. २३ ) प्रवासी दिन पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी, भोसरी आणि पिंपरी (नेहरूनगर) या ठिकाणी हा प्रवासी दिन साजरा करण्यात आला. दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत प्रत्येक डेपोत त्याबाबत नियोजन करण्यात आले होते.
बससेवेबाबतच्या प्रवाशांच्या तक्रारी या वेळेत घेण्यात येणार होत्या. प्रवासी दिनानिमित्त प्रत्येक डेपोसाठी नेमणूक केलेले पालक अधिकारी यावेळी उपस्थित होते. तसेच ज्या प्रवाशांना त्यांच्या दैनंदिन कामामुळे, वेळेअभावी डेपोमध्ये येऊन तक्रार किंवा सूचना करण्यास येता येत नसेल त्या प्रवाशांनी पीएमपीच्या मुख्य बसस्थानकांवर व पास केंद्रांवर अर्ज द्यावेत, असे यावेळी आवाहन करण्यात आले.
त्यात शहरातील निगडी या एकमेव आगारामध्ये एक सूचना प्राप्त झाली आहे. बससेवा वाढवावी, तसेच प्रवाशांना सेवा द्यावी असे त्यात म्हटले आहे. मात्र, पिंपरी आणि भोसरी या दोन्ही आगारात एकही तक्रार अथवा सूचना प्राप्त झाली नाही. या वरून प्रवासी त्याबाबत उदासिन असल्याचे दिसून आले.
स्वारगेट आगारात सर्वाधिक सूचना
पिंपरी-चिंचवडमध्ये तीन तर उर्वरित पुणे आणि परिसरासह एकूण १५ आगार आहेत. त्यापैकी स्वारगेट आगारात सर्वाधिक म्हणजेच १५ सूचना प्राप्त झाल्या. तर, भेकराईनगर ४ आणि कात्रज आगारात ५, शेवाळेवाडी आगारामध्ये २ तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत. तर, पीएमपी प्रशासनाच्या सेवेची २३ जणांनी प्रशंसा केली.
वाहक व चालक यासोबतच प्रशासनाची प्रशंसा केली आहे. अप्पर/ मार्केट यार्ड या आगारामध्ये ११ जणांनी चांगल्या सेवेचे, नियोजनाचे कौतुक केले आहे. त्या पाठोपाठ कोथरूड, कात्रज, शेवाळेवाडी, स्वारगेट या आगाराचे कर्मचारी व अधिकाऱ्यांची वाहवा केली आहे.