आषाढी एकादशी उत्साहात ः मंदिरांमध्ये कार्यक्रम, शाळांमध्ये पालखी सोहळा
विशेष : मुलांनी लुटला भजनाचा आनंद
पिंपरी – वैष्णवांचे आराध्यदैवत असलेल्या श्री विठ्ठलाचा आषाढी एकादशीचा सोहळा पिंपरी-चिंचवड कामगारनगरीत विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. एकादशीचा उपवास, भाविकांनी फुललेली मंदिरे, भक्तिगीत, भजनात दंग झालेले भाविक यामुळे शहर भक्तिरसात न्हाल्याचे पाहायला मिळत होते. शाळांमधून पालखी सोहळ्यासह विविध उपक्रम राबविण्यात आले.
आषाढी एकादशीनिमित्त शहरातील विविध भागांतील विठ्ठल मंदिरात भक्तांनी आज पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती. टाळमृदंगाच्या साक्षीने व विठू माऊलीच्या जयघोषांनी विठ्ठलाच्या सावळ्या मूर्तीवर स्नान व अभिषेकाचे संस्कार करून भक्तीभावाने पूजा-अर्चा करण्यात आली.
अनेक मंदिरात विठ्ठलमूर्तीला सालंकृत करण्यात आले होते. आकुर्डी, मासुळकर कॉलनी, काळभोरनगर, गांधीपेठ चिंचवडगाव, टाळगाव चिखली, भोसरी, फुगेवाडी, दिघी, मोशी, जुनी सांगवी, थेरगाव आदी भागातील विठ्ठल मंदिराचा परिसर “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’च्या नामघोषांनी दुमदूमून गेला.
हाती टाळ, वीणा आणि मुखात विठ्ठलाचा नामघोष करीत, पखवाजाच्या तालावर भजनी मंडळांकडून विठुरायाचे गोडवे गायले जात होते. गुलाल, बुक्का आणि चंदनाची उटी लावलेले टाळकरी व विठ्ठलाच्या चरणावर तुळस अर्पण करणाऱ्या महिलांच्या गर्दीने विठ्ठल- रुक्मिणी मंदिरे फुलून गेली होती. विठ्ठलाच्या दर्शनासाठी प्रौढ आणि वृद्धांच्या गर्दीत तरुणांची संख्याही लक्षणीय होती. शहरातील विविध शाळांमधून विद्यार्थ्यांनी पालखी सोहळा आयोजित केला होता. त्यात रिंगणही पार पडले.
एकादशीच्या उपवासानिमित्त शहरातील बाजारपेठांमध्ये फळ तसेच उपवासाच्या पदार्थांची मोठ्या प्रमाणावर रेलचेल आहे. रताळे, खजूर, केळी मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. झटपट साबुदाणा तसेच साबुदाण्याचे, वरई, शिंगाड्याच्या पीठचीही खरेदी झाली. वेफर्स, उपवासाची कचोरी, चिवडा या चटपटीत पदार्थांची आवर्जून खरेदी करण्यात आले.
व्हॉटस्ऍप, एसएमएस, फेसबूकद्वारे आषाढी एकादशीच्या शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. वाल्हेकरवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले. माजी विरोधी पक्षनेते तानाजी वाल्हेकर, मंडळाचे अध्यक्ष नथुशेठ वाल्हेकर, धनंजय वाल्हेकर, सागर वाल्हेकर, राजु वाल्हेकर, बाबु नढे, शैलेश चव्हाण, सचिन यादव, चेतन वाल्हेकर, विकास वाल्हेकर, सूरज वाल्हेकर, हर्षल बाबर आदींनी संयोजन केले.
मॉडर्न विद्यालयात भजन स्पर्धा
यमुनानगर येथील मॉडर्न विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापक सतीश गवळी, संस्थेचे सदस्य राजीव कुटे, पालक संघाच्या उपाध्यक्ष रेखा धामणे यांच्या हस्ते विठ्ठल-रुख्मिणीच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. पाचवी ते आठवीच्या वर्गातील मुलांनी खेळ मांडीयेला, केशवा माधवा, विठू माउली तू, टाळ बोले चिपळीला असे विविध अभंग सादर केले. मुख्याध्यापक सतीश गवळी, सांस्कृतिक समिती प्रमुख वर्षा पाचारणे, अमृता गायकवाड, साधना राऊत, उमा बीर्जे यांनी संयोजन केले. अमोल गायकवाड यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.
वृक्ष दिंडीतून पर्यावरण जनजागृती
जुनी सांगवीतील मृत्युंजय एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागाच्या वतीने वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षिका मनिषा दरेकर यांनी वृक्षांचे महत्त्व सांगितले. मुख्याध्यापिका प्रमिला जाधव व विजयमाला परदेशी यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले. लेझीम ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांनी पालखीला सलामी दिली. शाळेचे संस्थापक शामराव कदम, विश्वस्त एकनाथ ढोरे यांनी पालखीचे पूजन केले. नगरसेवक संतोष कांबळे, के. एच. ठाकर उपस्थित होते. शाळेकडून औषधी वनस्पतींची रोपे वाटप व वृक्षांचे महत्त्व सांगणाऱ्या हस्तलिखिताचे वाटप करण्यात आले. रिंगण सोहळ्यावेळी पालखीचे पूजन नगरसेविका माई ढोरे यांनी केले. लेझीम पथकाचे नियोजन सुप्रिया मोरे व सविता लबडे यांनी केले.
शिशुविहार विद्यालयात पालखी सोहळा
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या आकुर्डीतील शिशुविहार विद्यालयात पालखी सोहळा रंगला. संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड, मुख्याध्यापिका योगिता काळे व अन्य मान्यवर उपस्थित होते. भजन गात विद्यार्थ्यांनी पालखी विठ्ठल मंदिरात नेली. याठिकाणी आषाढी एकादशीची माहिती सुलभा दरेकर यांनी दिली. सूत्रसंचलन दीपाली मोहिते यांनी केले. सुरेखा नलावडे, माधवी भोसले, गौरी वाडकर, मंजुषा बावधनकर, बालिका कुलकर्णी, सीमा सोनवणे, कविता रोडे, नीलिमा धनवडे आदींनी संयोजन केले.
पालखी सोहळ्यातून सामाजिक संदेश
पिंपळे गुरवमधील देवकर पथ येथील एम. जी. देवकर एज्युकेशन ट्रस्ट संचलित, ब्रिलियंट स्टार प्री स्कूलच्या वतीने श्रीविठ्ठल-रखुमाई प्रतिमेचे पूजन संस्थापिका शांताबाई देवकर यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत जनाबाई, संत निवृत्ती, संत सोपान, संत मुक्ताबाई आदी संतांची वेशभूषा केली होती.
हातात भगव्या पताका घेऊन, झाडे लावा झाडे जगवा, बेटी बचाव, बेटी पढाव आदी सामाजिक संदेश देण्यात आले. भक्तिगीतांसह हरिनामाचा गजर करत ही दिंडी भक्तिमय वातावरणात साई मंदिरापर्यंत गेली. मंदिरात श्रीसाईंच्या प्रतिमेचे पूजन संभाजी नेवसे यांच्या हस्ते करण्यात आले. हभप ज्ञानदेव कारखीळे, रामदास देवकर, संभाजी नेवसे, नवनाथ देवकर, सरस्वती देवकर आदी उपस्थित होते. मुख्याध्यापिका वंदना देवकर व सर्व शिक्षकांनी संयोजन केले.
चिंचवड येथील नचिकेत बालग्राम व मातृसेवा मंदिर येथे पालखीपूजन माजी नगरसेविका आशा सूर्यवंशी, संस्थेचे अध्यक्ष भागचंद्र ब्रम्हेचा, विजया ब्रम्हेचा यांच्या हस्ते झाले. विद्यार्थी विठ्ठल, निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई यांच्या वेषात पालखीत सामील झाले होते. विठ्ठलनामाचा गजर करत विद्यार्थ्यांनी पालखी सोहळ्यात आनंदाने सहभाग घेतला.
बालग्राममध्ये विठ्ठल नामाचा गजर
आकुर्डीतील नवनगर शिक्षण मंडळाच्या श्री सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित सोहळ्यातील पालखीचे पूजन संस्थेचे संस्थापक प्रा. गोविंदराव दाभाडे यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले. प्राचार्या साधना दातीर, उपप्राचार्य विजय बच्चे, पर्यवेक्षक प्रदीप काळोखे, कोकिळा आहेर आदी उपस्थित होते. विठ्ठल-रुख्मिणी मंदिर प्रांगणात विद्यार्थ्यांनी रिंगण करून विठ्ठल नामाचा जयघोष करत भजन व नामस्मरण केले. प्रास्ताविक व निवेदन बजरंग जाधव यांनी केले. रमेश गायकवाड, प्रदीप गायकवाड, रेश्मा बनसोडे यांनी विद्यार्थी व्यवस्थापन केले.
विठ्ठल मंदिरात विद्यार्थ्यांचे रिंगण
झेप संस्थेच्या विशेष मुलांनी रस्टन कॉलनी येथील दत्त मंदिरात वारकरी वेशभूषा परिधान करून भजन व फुगडीचा आनंद घेतला. सर्व मुलांचे रस्टन कॉलनी मित्र मंडळ तसेच दत्त मंदिर व्यवस्थापन यांच्यातर्फे स्वागत करण्यात आले. पालखी सोहळ्यात सहभागी मुलांचा उत्साह अवर्णनीय होता. यानंतर मुलांना रस्टन कॉलनी मित्र मंडळ व दत्त मंदिर व्यवस्थापन यांच्या वतीने प्रसाद वाटप करण्यात आले. चिंचवड विधानसभा संघटक संतोष सौंदणकर, अश्विन मायनाळे, संतोष मेदने, गणेश परदेशी, संतोष मोरजकर व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.