शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक

कोल्हापूर – शाळेच्या पहिल्या दिवशी कोल्हापुरात शिक्षकाने आपल्या नवीन विद्यार्थ्यांची चक्क बैलगाडीतून मिरवणूक काढत शाळेत आणलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यातल्या दिगवडे येथील शाळेतील बाजीराव पाटील असे या शिक्षकाचं नाव आहे.

शाळेचा पहिला दिवस म्हटलं की, हटके स्टाइलने नवीन विद्यार्थ्यांचं स्वागत केल जाते. शहरात असणारी ही प्रथा आता कोल्हापूरच्या ग्रामीण भागात पोहचली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील दिगवडे येथील प्राथमिक शाळेतील बाजीराव पाटील या शिक्षकाने आज शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन विद्यार्थ्यांना चक्क सजवलेल्या बैलगाडीतून आणले. एवढेच काय तर ही बैलगाडी ऊस, रंगीबेरंगी फुगे आणि बैलांना झुल पांघरून सजवली होती. या सोबतच शाळेच्या बँड पथकानेही या नवीन विद्यार्थ्यांचं वाजत-गाजत स्वागत केलं. सर्व नवीन विद्यार्थ्यांची मिरवणूक गावातील प्रमुख रस्त्यावरून काढण्यात आली. तसेच त्यांचे शाळेत उत्साहात स्वागत करण्यात आलं. या मिरवणुकीत गावकरीही सहभागी झाले होते. नव्या विद्यार्थ्यांची आगळ्या-वेगळ्या स्टाईलने बैलगाडीतून काढलेली मिरवणूक सर्वत्र चर्चेचा विषय ठरली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)