पुणे – “फॅशन स्ट्रीट’ला असुविधांचे ग्रहण

व्यावसायिकांना सुविधा देण्यात कॅन्टोन्मेंट बोर्ड अपयशी

पुणे – एकीकडे “फॅशन स्ट्रीट’च्या जागी मॉल उभारायचे बोलले जात आहे. मात्र, त्याचवेळी या ठिकाणी मूलभूत सुविधादेखील पुरविण्यात कॅन्टोन्मेंट बोर्ड अपयशी ठरले आहे. हेही कमी म्हणून की काय व्यावसायिकांची पावती बंद करणे, त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणे, अतिक्रमणाच्या नावाखाली व्यावसायिकांना त्रास देणे असे प्रकार येथे घडत आहे. त्यामुळे बोर्डाला ही बाजारपेठ चालू ठेवायची आहे की नाही? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

दररोज लाखो रुपयांची उलाढाल असलेल्या लष्कर परिसरातील “फॅशन स्ट्रीट’ हे पुण्यातील तरुणाईची आवडीची बाजारपेठ आहे. दररोज शेकडो नागरिक याठिकाणी येऊन कपडे, जीवनोपयोगी वस्तू अशा विविध गोष्टींची खरेदी करत असतात. मात्र, पुण्यातील एक महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या “फॅशन स्ट्रीट’ला असुविधांचे ग्रहण लागले आहे. हेच कमी की काय म्हणून याठिकाणी मॉल उभारून बाजारपेठेतेल दुकाने त्या मॉलमध्ये स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव आधीच्या बोर्ड सदस्यांतर्फे कॅन्टोन्मेंट बोर्डासमोर मांडण्यात आला होता. मात्र, अद्याप यावर कोणताही विचार झालेला नाही. इतकेच नव्हे तर सध्या असलेल्या बाजारपेठेत सुरक्षा, सुरळीतपणा आणि मूलभूत सुविधा यासंदर्भातील कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचे गऱ्हाणे येथील व्यावसायिकांनी मांडले आहे.

सद्यःस्थितीत “फॅशन स्ट्रीट’ येथे 596 दुकाने आहेत. यापैकी 488 दुकाने अधिकृत असल्याचे “फॅशन स्ट्रीट पथारी असोसिएशन’तर्फे सांगण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर गेल्या सात वर्षांत 100 हून अधिक दुकाने अनधिकृतरीत्या थाटली गेली आहेत. मात्र, या दुकानांवर कारवाई करण्याऐवजी बोर्डातर्फे सरसकट सर्व व्यावसायिकांना वेठीस धरले जात आहे. आमच्याकडून भाडेतत्त्वासाठी घेण्यात येणारी पावती गेल्या वर्षभरापासून बंद करण्यात आली आहे. याठिकाणी पाण्याची, शौचालयांची सुविधा उपलब्ध नाही. व्यावसायिकांनी स्वखर्चाने पाण्यासाठी एक पाइपलाइन टाकून जेमतेम गरज भागवली आहे. मात्र, अद्यापही पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत. आमच्या मागण्यांकडे बोर्ड दुर्लक्ष करत असून त्यामुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे, अशी तक्रार असोसिएशनचे सचिव मजहर कुरेशी यांनी केली आहे.

याबाबत बोर्डाचे नगरसेवक दिलीप गिरमकर म्हणाले, “आधीच्या बोर्ड सदस्यांकडून सध्याच्या बाजारपेठेच्या ठिकाणी मॉल उभारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र, त्यानंतर त्याविषयी कोणतीही हालचाल झाली नाही. स्ट्रीटची सध्याची परिस्थिती अत्यंत गुंतागुंतींची असून त्यामुळे याठिकाणी सोयीसुविधा पुरविण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळेच येथे मॉल होणे हे व्यावसायिक आणि नागरिक दोन्हींसाठी फायद्याचे ठरेल.’

Leave A Reply

Your email address will not be published.