मोहिते पाटलांवर होणार कारवाई

अंकुश काकडे: पक्षात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू

पुणे – ऐन लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत, भाजपच्या गोटात सामिल झालेल्या खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी पुण्यात स्पष्ट केले. याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवर चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

माढा लोकसभा मतदारसंघातून आपला मुलगा रणजितसिंह मोहीते पाटील यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तिकिट मिळावे अशी मोहीते पाटलांची मागणी होती. मात्र, पक्ष त्यांच्या स्वत:च्या उमेदवारीसाठी आग्रही होता. त्यामुळे मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपशी हात मिळवणी केली आहे. त्यातच, बुधवारी माढा आणि बारामती लोकसभा मतदारसंघासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकलूज मध्ये सभा घेतली. या सभेत विजयसिंह मोहिते पाटील उपस्थित होते. तसेच त्यांच्या पंचाहत्तरी निमित्ताने मोदींच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कारही करण्यात आला आहे. मात्र, अद्याप मोहिते पाटील यांच्याबाबत पक्षाकडून काहीही कारवाई करण्यात आलेली नाही. याबाबत काकडे यांना विचारणा केली असता, मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत पक्षाने गंभीर दखल घेतली असून त्यांच्यांवर निश्‍चितच कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी वरिष्ठ पातळीवरील नेत्यांमध्ये चर्चा सुरू असून लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल असे काकडे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, बीड लोकसभा मतदारसंघात डॉ. प्रितम मुंडे यांना मतदान करावे असे आवाहन करणारे एक पत्र राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांच्या नावाने सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. हे पत्र त्यांचे नसून ही सही सुध्दा बनावट असल्याचा खुलासा काकडे यांनी केला आहे. त्याबाबत उदयनराजे यांनी लेखी खुलासा सादर केला असून त्याची प्रतच काकडे यांनी यावेळी उपस्थितांना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)