पाकिस्तानला जाऊ नका – अमेरिकेची नागरिकांना सूचना 

वॉशिंग्टन – पाकिस्तानमध्ये दहशतवादी घटना घडत असल्याने नागरिकांनी तेथे जाण्याचा फेरविचार करावा, अशी सूचना अमेरिकेने नागरिकांना केली आहे. जर पाकिस्तानात जावेच लागले तर बलुचिस्तान, खैबर पख्तुनवा आणि पाकिस्तान व्याप्त काश्‍मीर हे प्रांत तेथील दहशतवादी घटनांमुळे कुप्रसिद्ध बनले आहेत. त्यामुळे या प्रांतांमध्ये अजिबात जाऊ नये, अशी स्पष्ट सूचना अमेरिकेने नागरिकांना केली आहे.

सुरक्षिततेच्या दृष्टीने पाकिस्तानबाबत तिसऱ्या क्रमांकाचा इशारा देण्यात आला आहे. अमेरिकेने सोमवारी हा इशारा जारी केला. बलुचिस्तान, खैबर पख्तुनवा आणि पाकिस्तान व्याप्त काश्‍मीर या प्रांतांबाबत “अतिधोकादायक’ समजून चौथ्या क्रमांकाचा धोक्‍याचा इशारा देण्यात आला आहे. या धोकादायक भागांमध्ये अमेरिकेच्या नागरिकांनी प्रवास करू नये, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

पाकिस्तानातील दहशतवादी गट अगदी थोडी पूर्वसूचना देऊन किंवा कोणतीही पूर्वसूचना न देता प्रवासी वाहने, मार्केट, शॉपिंग मॉल, लष्करी छावण्या, विमानतळ, विद्यापिठे, पर्यटन केंद्र, शाळा, हॉस्पिटल, प्रार्थनास्थळे आणि सरकारी कार्यालयांवर घातपाती कारवाया करतात. दहशतवाद्यांनी यापूर्वी अमेरिकेच्या दूतावासावरही हल्ला केला आहे. यापुढेही अशाप्रकारचा हल्ला होऊ शकतो. पाकिस्तानात दहशतवादी हल्ल्यांमध्ये आतापर्यंत हजारो नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत, असेही अमेरिकेच्या सूचनेमध्ये म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.