झ्युरीच :- भारताचा स्टार भालाफेकपटू निरज चोप्रा याला येथे झालेल्या डायमंड लीग ऍथलेटिक्स स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक गटात दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. (Neeraj Chopra finishes 2nd in Zurich Diamond League) या स्पर्धेत नीरजची सुरूवातच सुमार झाली. त्याचे पहिले दोन थ्रो फाऊल ठरवले गेले. त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात त्याने 80.79 मीटर अंतरावर भाला फेकला.
चौथ्या प्रयत्नात त्याने 85.22 मीटर अंतर नोंदवले. पाचवा प्रयत्नही फाऊल ठरला. त्यानंतर सहाव्या व अखेरच्या प्रयत्नात 85.77 मीटर भाला फेकला होता. मात्र, त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच निरजने जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. मात्र, डायमंड लीगमध्ये त्याला प्रभाव पाडता आला नाही. यापूर्वी नीरजने एशियन गेम्स, राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले असून डायमंड लीगचे गेल्यावेळी विजेतेपदही मिळवले होते.