ICC Cricket World Cup 2023 : रोहित शर्माने या विश्वचषकात अप्रतिम कामगिरी केली आहे. जवळपास प्रत्येक सामन्यात त्याने संघाला चांगली आणि वेगवान सुरुवात करून दिली आहे. रोहितने नेदरलँड्सविरुद्ध विश्वचषकातील शेवटच्या साखळी सामन्यात 54 चेंडूत 61 धावांची खेळीही खेळली आणि अनेक विक्रम आपल्या नावावर केले. या खेळीच्या जोरावर रोहितने या विश्वचषकात 500 धावांचा टप्पा पार केला आणि अशी कामगिरी करणारा तो भारताचा पहिला कर्णधार ठरला.
रोहित शर्माने केला खास विक्रम…
विश्वचषकाच्या एकाच मोसमात 500 हून अधिक धावा करणारा रोहित शर्मा टीम इंडियाचा पहिला कर्णधार ठरला आहे. रोहितने या विश्वचषकात आतापर्यंत एकूण 9 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 55.88 च्या सरासरीने आणि 121.49 च्या उत्कृष्ट स्ट्राइक रेटने 503 धावा केल्या आहेत. या काळात रोहितने 1 शतक आणि 3 अर्धशतकं झळकावली आहेत. या विश्वचषकात आतापर्यंत रोहितने 24 षटकार आणि 58 चौकार मारले आहेत. या विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत फलंदाजामध्ये रोहित चौथ्या क्रमांकावर आहे.
आणखी एक विक्रम केला नावावर..
याशिवाय या विश्वचषकात रोहितने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. रोहित शर्माने वर्ल्डकपच्या दोन मोसमात 500 हून अधिक धावा करण्याचा विक्रमही केला आहे. रोहित शर्मापूर्वी सचिन तेंडुलकरनेही हा विक्रम केला होता. रोहित शर्माने गेल्या विश्वचषक 2019 मध्ये सर्वाधिक 648 धावा केल्या होत्या आणि आता या विश्वचषकातही त्याने 500 हून अधिक धावा केल्या आहेत. त्यामुळे विश्वचषकात दोनदा 500 धावांचा टप्पा ओलांडण्याच्या बाबतीत रोहितने सचिन तेंडुलकरची बरोबरी केली आहे.
#CWC23 #INDvNED : श्रेयस-राहुलची झंझावती शतके; टीम इंडियांचा नेदरलँड्ससमोर धावांचा डोंगर…
दरम्यान, रोहितला या विश्वचषकात आणखी किमान एक सामना खेळायचा आहे, जो टीम इंडियाचा सेमीफायनल सामना असेल. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. गेल्या विश्वचषकातही टीम इंडियाचा उपांत्य फेरीत न्यूझीलंडशी सामना झाला होता आणि त्या सामन्यात रोहित शर्मा लवकर बाद झाला होता. अशा परिस्थितीत रोहित यावेळी न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात शानदार खेळी करून गेल्या विश्वचषकाचा बदला घेण्याचा नक्कीच प्रयत्न करेल.