मुंबई – शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीमध्येही फुट पडली आहे. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारसोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर आता राष्ट्रवादीमधील वातावरण चांगलच तापायला सुरुवात झाली आहे. शरद पवारांसोबत असलेल्या नेत्यांनी ऍक्टिव्ह होत काही नेत्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय जाहीर करताच अजित पवार यांनी देखील पत्रकार परिषद घेत काही नव्या नेमणूक करत असल्याची घोषणा केली.
राष्ट्रवादीमध्ये आता शरद पवार आणि अजित पवार या दोन्हही नेत्यांकडून जोरदार राजकारण सुरु असताना नवीन घडामोडी समोर येताहेत. एकीकडे शरद पवार यांनी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांनी सुनीत तटकरे यांच्याकडे महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. अशात अजित पवार यांना तुम्ही सुप्रिया सुळेंची हकालपट्टी करणार का ? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता दादांनी आपलं स्पष्ट मत यावेळी मांडलं.
राष्ट्रवादीमध्ये सुरु झालेल्या पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे राजकीय वातावरण चांगलाच ढवळून निघालं आहे. अजित पवार यांनी आपल्या इतर सहकाऱ्यांसह आज पत्रकार परिषद घेत विविध गोष्टींबाबत आपली भूमिका मांडली. तुम्ही सुप्रिया सुळेंची हकालपट्टी करणार का ? असा सवाल विचारला असता अजित पवार म्हणाले,”आम्ही बेरजेचे राजकारण करतोय.. पक्ष वाढवतोय.. आम्ही हकालपट्टी करण्यासाठी बसलेलो नाही असं रोखठोक उत्तर यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल.
रुपाली चाकणकर आणि सुरज चव्हाण यांच्यावर नवी जबाबदारी
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर पक्षाच्या महिला अध्यक्षाची जबाबदारी यावेळी अजित पवारांनी सोपवली. तर राष्ट्रवादीच्या युवक अध्यक्षपदी सुरज चव्हाण यांची निवड करण्यात आली. शिवसेना आणि शिंदे गटात वाद झाल्यानंतर उदभवलेली परिस्थिती यावेळी राष्ट्रवादीमध्ये पाहायला मिळत आहे.