पुणे – अजित पवार हे माझे मोठे बंधू आहेत. माझ्यावर मोठ्या भावाचा मानसन्मान राखण्याचे संस्कार झाले आहेत आणि मी त्याच संस्कृतीत वाढले आहे. त्यामुळे अजित पवार विरोधात कधीही भूमिका मांडली नाही आणि मांडणार नसल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. पुण्यात विविध गणेशोत्सव मंडळांच्या गणपतींचे दर्शन घेतल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
गेल्या दहा वर्षांत केंद्रातील भाजपा सरकारने विविध तपास यंत्रणांचा गैरवापर करून पक्ष संपविण्याचे काम केले आहे. या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकवेळा भाषणामधून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा नॅचरल करप्ट पार्टी म्हणून उल्लेख केला आहे. पण आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील एक घटक त्यांच्यासोबत गेला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता “तो’ उल्लेख करीत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर केलेले आरोप राजकीय होते की खोटे होते, की खरे होते.
तुम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसवर केलेले आरोप खरे असतील तर त्याची चौकशी झाली पाहिजे. जर आरोप खोटे असतील तर दिलगिरी व्यक्त केली पाहिजे, अशी मागणी करीत सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला. महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष दिल्लीला जातात आणि ही नोटीस वगैरे दिली जाते. हा खरंच योगायोग असू शकतो का की दिल्लीला विधानसभा अध्यक्ष जातात आणि त्यानंतरच राष्ट्रवादी कॉंग्रेसमधला एक सोडून गेलेला घटक काहीतरी पावले उचलतो.
शिवसेना व राष्ट्रवादी पक्ष हा टिकताच कामा नये असे कारस्थान चालू आहे. पण हे दोन्ही पक्ष या अदृश्य हाताला जड जात आहेत. कदाचित त्यामागे भाजपा असू शकते. ही भाजपाची असुरक्षितता आहे. त्यामुळेच महाराष्ट्राविरोधात हे कटकारस्थान चालू आहे, अशी टीका त्यांनी केली.