सिंधुदुर्ग – युतीत एकत्र असणाऱ्या दीपक केसरकर यांच्यावर स्थानिक भाजप नेत्यांकडून अनेकदा होणारी जहरी टीका आणि त्यानंतर सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांना भाजपच्या युवा आघाडीचे उपाध्यक्ष पदाची संधी देण्यात आली आहे. यामुळे भाजप सावंतवाडीमध्ये शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांच्याविरोधात उमेदवार देणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोकणात आपले पाय रोवण्यासाठी भाजपने थेट राजघरण्याचीच निवड केली आहे. त्यासाठी युवराज लखमराजेंच्या नावाची चाचपणी भाजपकडून चालू असल्याची सध्या चर्चा आहे. गेली अनेक वर्षे सावंतवाडीमध्ये केसरकर यांचे चांगले वर्चस्व असल्याचे दिसून येत आहे.
यात त्यांना पहिला धक्का बसला तो भाजपचे संजू परब यांची नगराध्यक्षपदी निवड झाल्यामुळे. तर दुसरीकडे भाजपची म्हणावी तशी या मतदारसंघावर पकड नव्हती. मात्र, राणेंना सोडून नितेश राणेंविरोधात कणकवली विधानसभा लढवण्यासाठी शिवसेनेत गेलेले सतीश सावंत यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे लॉरेन्स मान्येकर विजयी झाले.
त्याआधी बांदा गावच्या सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे अक्रम खान निवडून आले आणि आता सावंतवाडी नगराध्यक्षपदावर तर राणेंसमर्थक परब निवडून आले. सावंतवाडी नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे संजू परब यांनी शिवसेनेच्या बाबू कुडतरकर यांचा 313 मतांनी पराभव केला होता. यामुळे हळूहळू भाजपकडून मतदार संघात संघटन तयार करण्यात येत असून ही 2024 च्या निवडणुकीच्या तयारी सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
राजघराण्याला मानणारा वर्ग
युवराज लखमराजे भोसले यांनी गेल्यावर्षी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी गावोगाव बैठकांच्या माध्यमातून त्यांनी संघटना वाढवण्यासाठी जोमाने काम सुरू केले. त्यांनी गावागावांत भेटीगाठी सुरू केल्या होत्या.
त्यांच्या कामाची दखल घेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार लखमराजेंची ही निवड करण्यात आली. लखमराजे यांच्यामुळे राजघराण्याला मानणारे अनेक जण भाजपासाठी काम करू लागल्याचीही माहिती आहे.