कर्जत – लोकप्रिय कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या करत आयुष्य संपवल्यानंतर शुक्रवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. देसाईंवर त्यांच्या एन.डी. स्टुडिओमध्येच शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी यावेळी मानवंदना दिली. यावेळी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांबरोबरच राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
“मराठी पाऊल पडते पुढे’ या कार्यक्रमाच्या सेटवर देसाईंनी आत्महत्या केली होती. त्यांनी एका चिठ्ठीत “माझा अंत्यविधी सहा नंबरचा ग्राऊंड आहे, तिथे हॅलिपॅड आहे, त्या ठिकाणी व्हावा,’ असे लिहित आपली शेवटची इच्छा व्यक्त केली होती. तसेच तत्पूर्वी, “जोधा अकबर’ सिनेमाच्या सेटवर नितीन देसाई यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार उदयनराजे भोसले, आमदार आशिष शेलार, मधुर भांडारकर, रवी जाधव, शिवसेना नेते शिशिर शिंदे यांनी देसाईंच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. मराठी सिने सृष्टीतील सुबोध भावे,
मानसी नाईक, निखिल सानेदेखील यावेळी उपस्थित होते. देसाई यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, एक भाऊ आणि बहीण आहे. देसाई यांना अखेरचा निरोप देताना सर्वसामान्यांसह सेलिब्रिटीदेखील भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.