नवी दिल्ली – अमेरिकेतील टेस्ला या इलेक्ट्रिक कार कंपनीला भारतात आपली वाहने लवकर सादर करण्याची इच्छा आहे. मात्र बऱ्याच धोरणात्मक अडचणी कमी करण्यासाठी आम्ही सरकार बरोबर प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे या कारच्या सादरीकरणाला उशीर होत आहे, असे टेस्ला कंपनीचे प्रमुख ऍलन मस्क यांनी सांगितले.
टेस्ला कारच्या चाहत्यांनी या कार भारतात येण्यास कधी सुरुवात होईल असे विचारले असता मस्क यांनी ट्विटरवरून सांगितले की, सरकार बरोबर बरेच अडथळे कमी करण्यासाठी काम चालू आहे.
भारतात इलेक्ट्रिक वाहनावर जास्त आयात शुल्क आहे. ते कमी करावे असे आवाहन गेल्या वर्षी टेस्ला कंपनीने केले होते. मात्र कंपनीने अगोदर भारतात वाहनांची निर्मिती करण्यास सुरुवात करावी, त्यानंतर कर कमी करण्याच्या शक्यतेवर विचार करण्यात येईल असे अवजड उद्योग मंत्रालयाने सांगितले होते.
टेस्ला कंपनीच्या ज्या सवलती मागत आहे, त्या इतर कुठल्याही कंपनीला देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे टेस्ला कंपनीला सवलती दिल्यानंतर इतर कंपन्यांबरोबर भेदभाव केल्यासारखे होईल. सध्या 40 हजार डॉलरवरील इलेक्ट्रिक कारवार 60 ते 100 टक्के इतके आयात शुल्क लागते. सर्व कारवर साधारणपणे 40 टक्के आयात शुल्क ठेवावे, अशी सूचना टेस्ला कंपनीने केलेली आहे.
तसे केले तर भारतात कारची आयात होऊन यासाठी एक पूरक वातावरण निर्माती होईल. त्यानंतर टेस्ला कंपनी भारतात उत्पादन सुरू करण्याच्या शक्यतेवर विचार करेल असे टेस्ला कंपनीने सांगितले होते.
जानेवारी 2021 मध्ये टेस्ला कंपनीची उपकंपनी भारतात नोंदण्यात आली होती. त्यानंतर या कार भारतात लवकरच येतील असे वाटले होते. परंतु आता मस्क यांच्या स्पष्टीकरणामुळे यासाठी बराच वेळ लागण्याची शक्यता असल्याचे दिसून येते.