कोल्हापूर – अनुसूचित जाती नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर येथे वसतीगृह उभारण्यासाठी १४ कोटी ७१ लाख ३५ हजार २२४ रुपये इतक्या रकमेला मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली आहे.
शिरोळ तालुक्यातील मौजे आगर येथे अनुसूचित जाती, नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी मुलांचे स्वतंत्र अद्ययावत वसतीगृह व्हावे, याबाबतची मागणी सामाजिक न्याय विभागाकडे सातत्याने केली होती. काही महिन्यांपूर्वी वसतीगृह उभारण्याबाबत शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने सकारात्मक भूमिका घेतली होती, याचाच भाग म्हणून राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागाने यापूर्वीच अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींसाठी जयसिंगपूर येथे १०० विद्यार्थिनी क्षमता असलेल्या वसतिगृहास १० कोटी ७५ लाखाच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे.
यानंतर समाजकल्याण आयुक्तालय, पुणे यांच्या माध्यमातून अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठी २०० विद्यार्थी क्षमतेचे वसतीगृह शिरोळ तालुक्यातील मौजे आगर येथे उभारण्यासंदर्भातील प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला होता. हा प्रस्ताव बांधकाम विभागाची तांत्रिक सहमती मिळण्याकामी सादर करण्यात आला होता. बांधकाम विभागाने पारित केल्या प्रमाणे १४ कोटी ७१ लाख ३५ हजार २२४ रुपये इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यास सहमती दर्शविल्यानंतर राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागाने यास ११ जानेवारी २०२२ रोजी प्रशासकीय मान्यता दिली आहे.
त्यामुळे अनुसूचित जाती नवबौद्ध मुलींसाठीचे वसतिगृह जयसिंगपूर येथे तर मौजे आगर येथे विद्यार्थ्यांसाठींचे वसतीगृह उभारणी कामाला लवकरच सुरुवात होईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली आहे.
हा निधी मंजूर करण्याकामी सहकार्य केलेबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व सामाजिक न्याय विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांचे राज्यमंत्री यड्रावकर यांनी आभार व्यक्त केले आहेत.