नवी दिल्ली –जगातील आघाडीचे उद्योगपती इलॉन मस्क यांचा भारत दौरा लांबणीवर पडला. त्यावरून कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्तारूढ भाजपवर निशाणा साधला. मस्क यांनी मावळत्या पंतप्रधानांच्या भेटीसाठी येण्याची बाब काहीशी विचित्र होती. काय घडणार ते समजल्याने बहुधा त्यांनी दौरा स्थगित केला, असे कॉंग्रेसने म्हटले. (Congress hits target to bjp as Elon Musk postpones India tour)
मोदी यांची भेट घेण्यासाठी मस्क भारतात येणार होते. मात्र, त्यांच्या टेस्ला कंपनीशी संबंधित कार्याच्या व्यस्ततेमुळे त्यांनी भारत दौरा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला. त्यावर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी सोशल मीडियावरून प्रतिक्रिया दिली. लवकरच इंडिया आघाडीचे पंतप्रधान मस्क यांचे भारतात स्वागत करतील, असेही त्यांनी म्हटले.
त्या प्रतिक्रियेतून रमेश यांनी देशात सत्ताबदल होण्याविषयीचा दावा केला. सध्या लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. त्या निवडणुकीत इंडिया आघाडीचा विजय होणार असल्याचा विश्वास कॉंग्रेसकडून व्यक्त केला जात आहे. त्या विश्वासाचा आधार घेऊन रमेश यांनी मस्क यांचा दौरा लांबणीवर पडल्यावरून भाजपला डिवचण्याची संधी साधली. दरम्यान, मस्क 21 आणि 22 एप्रिल असे दोन दिवस भारत दौऱ्यावर येणार होते.