Elon Musk come to India – इलेक्ट्रिक कार उत्पादक टेस्लाचे संस्थापक इलॉन मस्क या महिन्याच्या शेवटी भारतात येत आहेत. त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. या दौऱ्यादरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. त्यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून या दौऱ्याबाबतची माहिती दिली. (Elon Musk to launch big project in Maharashtra? Will come to India this month and meet PM Modi)
मस्क म्हणाले की, मी भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यास उत्सुक आहे. दरम्यान, मस्क यांची ही भेट अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे कारण या काळात ते भारतात नवीन टेस्ला कारखाना उभारण्यासाठी मोठ्या गुंतवणुकीची घोषणा करण्याची शक्यता आहे. 22 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात मस्क पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यादरम्यान मस्क आणखी काही महत्त्वाच्या घोषणाही करू शकतात.
Looking forward to meeting with Prime Minister @NarendraModi in India!
— Elon Musk (@elonmusk) April 10, 2024
टेस्ला प्लांटसाठी दोन अब्ज डॉलरची गुंतवणूक –
यापूर्वी टेस्लाचे काही अधिकारी भारतात येऊ शकतात अशी बातमी होती. हे अधिकारी टेस्लाच्या भारतातील नवीन प्लांटचे ठिकाण पाहण्यासाठी भारतात येणार होते. पण आता इलॉन मस्क स्वतः याच महिन्यात भारतात येणार असल्याची पुष्टी झाली आहे. टेस्लाच्या भारतातील प्लांटसाठी सुमारे दोन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक अपेक्षित आहे.
टेस्ला आणि रिलायन्स व्यवहार –
टेस्ला भारतात प्लांट बनवणार असल्याची बातमी आहे. अशा परिस्थितीत टेस्ला भारतात व्यवसाय सुरू करण्यासाठी स्थानिक भागीदाराच्या शोधात आहे. अहवालानुसार, अमेरिकन ऑटो कंपनी भारतात रिलायन्ससोबत प्लांट उभारण्यासाठी संयुक्त व्यवसाय करण्याची शक्यता आहे. प्रकल्पासाठी संभाव्य ठिकाणांमध्ये गुजरात आणि महाराष्ट्राचा समावेश आहे. महाराष्ट्र हे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण असल्याचे सांगितले जाते.
मस्क यांनी गेल्या वर्षी अमेरिकेत पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती –
गेल्या वर्षी जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. एलोन मस्क मोदींना तिथे भेटले. टेस्लाने गेल्या वर्षी जुलैमध्ये सांगितले होते की, 24,000 डॉलर किंमतीच्या ईव्हीचे उत्पादन करण्यासाठी भारतात कारखाना उभारण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे.
इलॉन मस्क यांनी 2019 च्या सुरुवातीला भारतात गुंतवणूक करण्यात स्वारस्य दाखवले होते. मात्र, त्यांनी उच्च आयात करावर आक्षेप घेतला होता. पण भारत सरकारने स्पष्टपणे सांगितले की टेस्लाने भारतात उत्पादन प्रकल्प उभारल्यास सवलतींचा विचार केला जाईल. सरकारने टेस्लाला चिनी बनावटीच्या कार भारतात विकण्याची परवानगी दिलेली नाही. देशांतर्गत विक्री आणि निर्यातीसाठी उत्पादन करता यावे यासाठी सरकारने एलोन मस्क यांच्या कंपनीला देशात उत्पादन प्रकल्प उभारण्यास सांगितले होते.