पुणे – वेताळ टेकडीवर मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नात तरुण खोल खाणीतील पाण्यात पडला. या घटनेत तो जखमी झाला आहे. परंतु, अग्निशमन दलाच्या जवानांनी मदतीसाठी धाव घेत त्याला सुखरुप बाहेर काढले. रामदास उभे (24, रा. कोथरुड) असे तरुणाचे नाव आहे.
रामदास हा गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास वेताळ टेकडीवर दोन बहिणींसह फिरायला गेला होता. त्यावेळी खाणीजवळील टेकडीच्या टोकावर एक मांजर ओरडताना दिसली. रामदास हा तिला वाचवण्यासाठी गेले असता तोच तोल जाऊन 70 ते 80 फूट खोल असलेल्या पाण्याच्या तळ्यात पडला.
हे पाहून घाबलेल्या त्याच्या बहिणींनी याबाबत अग्निशमन दलास माहिती दिली होती. अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान राजेश जगताप, राजेश कुलकर्णी, विजय शिंदे सचिन आयवळे, शैलेश दवणे, प्रवीण रहाटे, पंढरीनाथ उभे, संजय भावेकर, प्रकाश कांबळे, हेमंत कांबळे, शुभम गोल्हार, सचिन वाघोले, अमोल शिंदे यांनी सहभाग घेतला.