नवी दिल्ली – केंद्रीय अन्वेषण विभागाच्या माजी प्रमुखांचा सहभाग असलेल्या कथित गैरव्यवहार चौकशी प्रकरणावरून आज दिल्ली येथील न्यायालयाने सीबीआयची चांगलीच कानउघाडणी केली. याबाबत निरीक्षण नोंदवताना न्यायाधीश संजीव अगरवाल यांनी, “अशा तपासामुळे सीबीआय या प्रकरणाच्या तपासासाठी इच्छूक नसल्याचा निष्कर्ष निघतो” अशा शब्दांमध्ये सुनावलं.
मांस निर्यात व्यापारी मोईन अख्तर कुरेशी गैरव्यवहार प्रकरणामध्ये सुनावणी करताना न्यायालयाने सीबीआय तपासाच्या ‘गोगलगाई’ गतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकरणात सीबीआयच्या दोन माजी प्रमुखांचा सहभाग असल्याचा आरोप असून न्यायालयाने सीबीआयला या प्रकरणाची अद्यावत माहिती देण्याचे आदेश दिले.
याबाबत सुनावणी करताना न्यायालयाने सीबीआयला शनिवारी, कुरेशी याच्याशी संबंध असल्याचा आरोप असलेले सीबीआयचे माजी प्रमुख रणजित सिन्हा यांचा तपास सुरु आहे का? असेल तर त्यांची याप्रकरणात चौकशी करण्यात आली का? नसेल तर का नाही? असे प्रश्न विचारले.
आपल्या कार्यकाळात कथित गैरव्यवहार प्रकरणाचा तपास पुढे सरकू न देण्याचा आरोप सीबीआयचे माजी प्रमुख अलोक वर्मा यांच्यावर आहे. न्यायालयाने याबाबत चौकशी झाली का? असा प्रश्नही उपस्थित केला.
याखेरीज सीबीआयचे आणखी एक माजी प्रमुख ए पी सिंग यांची चौकशी का करण्यात आली नाही? असा जाब न्यायालयाने विचारला.