Parashottam Rupala । गुजरातमधील राजकोट लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार परशोत्तम रुपाला यांनी पुन्हा एकदा या समाजाची माफी मागितलीय. जसदणमध्ये झालेल्या निवडणूक सभेला संबोधित करताना रुपाला यांनी ही माफी मागितली. ‘माझ्याकडून चूक झाली, मी जाहीर माफीही मागितली आहे. माझा कोणताही चुकीचा हेतू नव्हता, मी क्षत्रिय समाजात जाऊन माफी मागितली, त्यांनीही मला प्रतिसाद दिला. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध का? असा सवाल यावेळी त्यांनी केला.
मग त्यांचा विरोध माझ्यामुळे का? Parashottam Rupala ।
परशोत्तम रुपाला क्षत्रिय समाजाला उद्देशून बोलताना, ‘तुम्ही तुमचे राष्ट्रासाठीचे योगदान लक्षात ठेवा, भाजपच्या विकासातील तुमचे मोठे योगदानही लक्षात ठेवा. 18 तास काम करणारे पंतप्रधान मोदी जेव्हा देशाशिवाय कशाचाही विचार करत नाहीत, 140 कोटी जनतेला आपले कुटुंब मानतात, अनेक क्षत्रिय PM मोदींच्या विकासाच्या वाटचालीत त्यांच्यासोबत राहिले आहेत, मग त्यांचा विरोध माझ्यामुळे का? मला माझी चूक मान्य आहे. पण क्षत्रिय समाजाला पीएम मोदींच्या विरोधात उभे करणे मला योग्य वाटत नाही. कृपया पंतप्रधानांविरोधात दाखवल्या जात असलेल्या संतापाचा पुनर्विचार करा.
डॅमेज कंट्रोलचे सर्व प्रयत्न प्रयत्न करूनही नाराजी कायम
मात्र, भाजपचे डॅमेज कंट्रोलचे सर्व प्रयत्न होऊनही गुजरात, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांतील क्षत्रिय समाजातील संताप कमी होताना दिसत नाही. गेल्या काही आठवड्यांपासून या राज्यांमध्ये भाजपच्या विरोधात समाजाकडून नियमित निदर्शने होत आहेत. भाजपची कोअर व्होट बँक असलेल्या राजपूत पहिल्या दोन टप्प्यात मतदान केंद्रांपासून दूर राहिले, असे सांगण्यात येते. क्षत्रिय समाजाच्या सततच्या विरोधानंतरही परशोत्तम रुपाला यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. तेव्हापासून गुजरातमधील क्षत्रिय समाज भाजपच्या सर्व उमेदवारांना भगवे झेंडे घेऊन धार्मिक रथ काढून विरोध करत आहे.