जुन्नर -तू कोणाची सुपारी घेऊन आला आहेस का? आम्हाला कळत नाही का, आम्ही देखील मराठ्याचेच आहोत. आज शिवजयंती आहे असे चालणार नाही, म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषणात अडथळा आणणाऱ्या तरुणाला सुनावले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवजयंतीनिमित्त शिवनेरी गडावर हजेरी लावली. या कार्यक्रमात अजित पवार यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली तेव्हा एक तरुण उभा राहिला आणि त्याने मराठा आरक्षणाची मागणी केली.
यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, काही तरुणांनी मराठा आरक्षणाची मागणी केली. मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयीन प्रक्रियेत अडकले. आम्ही आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहोत, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळाले पाहिजे असे देखील ते म्हणाले.
त्याचवेळी पुन्हा तो तरुण पुन्हा उभा राहिला आणि मराठा आरक्षणासाठी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली, तेव्हा अजित पवार संतापले अन् त्या तरुणाला वरील वाक्य सुनावले. या कार्यक्रमात काहीसा गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर जवळच उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्या तरुणाला शांत करण्याचा प्रयत्न केला.
नियमाप्रमाणे मुख्यमंत्री दरवर्षीप्रमाणे शिवनेरीवर येतात याठिकाणी नतमस्तक होतात; मात्र उद्धव ठाकरे यांना हेलिकॉप्टरने प्रवास करायला अजून बंदी आहे. त्यामुळे ते येऊ शकले नाही. शिवाजी महाराजांबद्दल आदर प्रेम प्रत्येक पिढीगणिक वाढत चालला आहे. प्रत्येक पिढीला महाराजांकडून प्रेरणा मिळते.
गडाचे संवर्धन करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जुनी ओळख टिकवून गडाचे संवर्धन करणार. निधीची कमतरता नाही, मात्र प्रत्येक विभागाची परवानगी घेऊन कामे करावी लागतात त्यामुळे उशीर होतो. यंदा देखील करोनाचे सावट असल्याने सर्व शिवप्रेमींना येता आले नाही असे देखील उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
त्यात राजकारण नको
मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही कायमच राज्य शासनाची भूमिका आहे; मात्र घटनात्मक तरतुदीमुळे आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांच्यावर नेता येणार नाही ही भूमिका सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी शासनाचे सर्व ते प्रयत्न सुरू आहेत.
कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता हे आरक्षण देण्याची शासनाची भूमिका आहे. त्यासाठी पंतप्रधानांची भेट घेऊन कायद्यात बदल करून आरक्षणाची मर्यादा वाढवण्याबाबत विनंती केली आहे. कोणतेही राजकारण न करता सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला यातून मार्ग काढायचा आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नमूद केले.