बारामती/ जळोची – राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे नेहमीच चर्चेत असतात. खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकतेच त्यांना राजकारणातील अमिताभ बच्चन अशी उपमा दिली होती. त्यामुळे अनेक राजकीय चर्चा झाल्या होत्या. मात्र, रविवार (दि.19) बारामतीमध्ये अजित पवार हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी चक्क धनुष्यबाण हातात घेऊन अचूक निशाणा लावला आहे. पण तो निशाणा कोणासाठी लावला आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे बारामतीसह जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण
आले आहे.
बारामती येथे एन्व्हायरमेंट फोरम ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित केलेल्या “हॅप्पी स्ट्रीट कार्यक्रमास पवार यांनी हजेरी लावली होती. या ठिकाणी विविध खेळांचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी “धनुष्यबाण हातात घेऊन अचूक निशाणा लावला. हे दृश्य कॅमराबद्ध झाल्यानंतर राजकीय चर्चेचा बाजार गरम झाला आहे.
राज्यातील राजकारणातील अजित पवार हे मोठे नाव अजित पवार नेहमी आपल्या स्पष्टवक्तेपणाबद्दल चर्चेत असतात. राज्याचे राजकारण बदलत असताना अजित पवार हे नेहमी त्यात सक्रिय असल्याचे देखील पहायला मिळते. आज बारामतीच्या दौऱ्यावर असताना विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील पवार यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. त्यात त्यांनी धनुष्यबाण उचलून अचूक निशाणा साधला. यातून तर्क- वितर्कांना उधाण आले. मात्र, हा निशाणा कोणासाठी होता, हे पाहणे देखील तितकेच महत्वाचे ठरणार आहे.
ऍक्शन मोडवर
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे सध्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सक्रिय झालेले पहायला मिळत आहेत. तसे आदेशही त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. निवडणुकीच्या ऍक्शन मोडवर असलेले अजित पवार हे राजकारणातील बदलत्या वाऱ्याची दिशा ओळखून वक्तव्यातून ते आगामी संकेत देतात.
सध्या ते स्वतः देखील राज्यभर दौरे करीत आहेत. सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. मात्र, बारामती दौऱ्यातील त्यांच्या या कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अजित पवार यांनी लावलेला निशाणा नेमका कोणासाठी, हे आता पहावे लागणार आहे.