नाशिक : मुले खेळताना त्यांच्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आपला हलगर्जीपण नसत्या संकटाला आपल्याकडे घेऊन येऊ शकतो. अशीच एक दुर्दैवी घटना नाशिकमधून समोर येत आहे. घरात झोका खेळताना एक दहा वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाल्याची माहिती उघड झाली आहे. घरात दोघे भाऊ झोका खेळत असताना त्यातल्या मोठ्या मुलाला अचानक गळफास लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
नाशिकच्या अंबड भागातील म्हाडा कॉलनीत ही घटना घडली आहे. निखिल निंबा सैंदाणे याला घरातील छताला लोखंडी हुकला लावलेल्या झोक्याच्या दोरीचा फास बसल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वडील कंपनीमध्ये कामाला गेले होते. तर आई काही कामासाठी शेजारी गेली होती. निखिल आणि त्याचा लहान भाऊ घरात एकटेच झोका खेळत होते. एकानंतर एक असे दोघे जण झोक्याचा खेळ करत होते.
धाकट्या भावाचा झोका घेऊन झाल्यावर निखिलने झोका खेळायला सुरुवात केली. पलंगावरुन तो झोका खेळत होता. त्याने झोका गोल गोल फिरवला आणि त्याच्या मानेला झोक्याची दोरी आवळली गेली. आधी तो पलंगावर असल्याने त्याला ते जाणवले नाही मात्र त्याने उंच झोका घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातच त्याच्या गळ्याला फास लागला आणि तो खाली पडला.
आपला भाऊ खाली पडल्यानंतर काहीच बोलत नसल्याने धाकट्या भावाने ही गोष्ट जाऊन आईला सांगितली. निखिलच्या आईने तातडीने घराकडे धाव घेतली. निखिल निपचित पडला होता. आईने तात्काळ दोरी कापून त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत सगळं संपलं होत. आईने हंबरडा फोडला. आवाज ऐकून शेजारचे लोक जमा झाले होते. सगळ्यांनी त्याला जिल्हा रुग्णालयात नेले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अचानक घडलेल्या घटनेने सैंदाणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.